Fri, May 24, 2019 03:06होमपेज › Solapur › बोलेरो कॅनॉलमध्ये कोसळली; तिघे ठार

बोलेरो कॅनॉलमध्ये कोसळली; तिघे ठार

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:54PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

रमजान ईदनंतर फिरायला जाणार्‍या जामनेर (जि. जळगाव) येथील  एका मुस्लिम कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. अहमदनगर-टेंभुर्णी या राज्य महामार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ रस्त्याच्या कठड्याला बोलेरो गाडी धडकून झालेल्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. 

गाडी कठड्याला धडकल्यानंतर गाडीचे दोन तुकडे झाले. गाडीतील दोघे व अर्धी गाडी उडून दहिगाव कॅनॉलमध्ये 70 फूट खोलवर जाऊन पडली, तर कठड्यात अडकलेल्या अर्ध्या गाडीत एक जण ठार झाला. हा अपघात बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. फारुख रमजान शेख (वय 57), फरहान एहसान खान (गाडी चालक, वय 23,  दोघेही रा. इस्लामपुरा, ता. जामनेर, जि. जळगाव), तहेरीम हारीस जफरअहमद शेख (वय 22, रा. कोर्ट मोहल्ला, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. 

हे तिघे बोलेरो (वाहन क्रमांक  एम एच 19/ बीयू 9856)  व इतर दुसरे नातेवाईक दुसर्‍या वाहनातून (एम एच 19/ 8663) हे जामनेरवरून ईदनंतर फिरायला गोवा येथे चालले होते.
कुंभेज फाट्याजवळ हा रस्ता अरूंद झाला आहे. येथील पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने या अपघातातील  वाहनचालकाला याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वेगाने आलेले वाहन पुलावरून नेण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व उजव्या बाजूच्या पुलाच्या कठड्याला गाडी जोरात धडकून हा भीषण अपघात झाला.

या अपघाताची माहिती अज्ञात इसमाने पहाटेच्या सुमारास करमाळा पोलिस ठाण्यामध्ये दूरध्वनीवरून दिली. यावेळी ठाणे अंमलदार हवालदार फिरोज आतार यांनी तातडीने गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी तात्काळ हवालदार संजय देवकर, केदारनाथ भरमशेट्टी, राजेंद्र कावळे, संतोष वाघमारे, सिद्धेश्‍वर लोंढे, जालिंदर गोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सतीश मुटेकर, विनोद कादगे, विष्णू निमगिरे आदींनी मृतदेह कॅनॉलमधील पाण्यातून वर काढले तसेच पुलावरील  कठड्यातील वाहनामध्ये अडकलेले फारुक शेख यांनाही बाहेर काढले. त्यांना करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या सर्वांना मृत घोषित केले.

याबाबत मृतांचे नातेवाईक अमजद शौकत मिर्झा (वय 30 रा. जामनेर) यांनी करमाळा पोलिसांमध्ये वाहनचालकाच्या बेफिकिरीने व हयगयीने वाहन चालवून  स्वतःच्या  व इतर दोघांच्या  मृत्यूस  कारणीभूत  झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी  उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  राजेश देवरे  यांनी भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, केदारनाथ भरमशेट्टी करीत आहेत.