Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाकडे 

बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाकडे 

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 8:28PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रशासकीय यंत्रणेकडील आर्थिक कारभार रीतसर संचालक मंडळाकडे घेण्यात आला. सभापती व उपसभापती निवडीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत आर्थिक विषयाबाबत सह्यांचे अधिकार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. गत दीड वर्षापासून प्रशासकीय यंत्रणेच्या हातात असलेला कारभार गुरुवारपासून खर्‍याअर्थाने संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली आला आहे 

यावेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा-पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, वसंत पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, बसवराज इटकळे, केदार उबंरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते. सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी सोमवारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज संचालक मंडळाची पहिली सभा घेण्यात आली. सभापती दिलीप माने यांना बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांचे दालन उपलब्ध करुन देण्यात आले आहे, तर सचिव मोहनराव निंबाळकर यांचे दालन उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्यासाठी देण्यात आले आहे. दोघांच्या दालनासमोर नवीन नामफलक लावल्याचेही यावेळी दिसून आले. 

संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीसाठी नवनिर्वाचित संचालक बाजार समितीत आल्याने यावेळी शेतकरी, बाजार समितीमधील अडतदार, व्यापारी यांची गर्दी दिसून आली.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि पदाधिकार्‍यांकडून बाजार समितीचा कारभार यशस्वीपणे चालवून शेतकर्‍यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येतील, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्‍त होत आहे. बाजार समिती निवडणुकीत लोकांनी याच विश्‍वासाने मतदान केले आहे. सभापती दिलीप माने व त्यांचे सहकारी यांच्याकडून शेतकर्‍यांना निश्‍चितच न्याय मिळेल, अशी भावना शेतकर्‍यांमध्ये आहे.