Thu, Mar 21, 2019 11:21होमपेज › Solapur › परंडा येथील गटविकास अधिकार्‍यास बार्शीत मारहाण

परंडा येथील गटविकास अधिकार्‍यास बार्शीत मारहाण

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:42PMबार्शी ः तालुका प्रतिनिधी

उपोषणादरम्यान विष प्राशन केलेल्या आंदोलनकर्त्यास भेटण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या परंडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यास दोघांना चौघांनी लाथांनी बेदम मारहाण केली. ही  घटना बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात घडली.  गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे (रा. बार्शी) व विस्तार अधिकारी छत्रभूज पाखले अशी मारहाण झालेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. 

विविध शासकीय योजनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत परंडा येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याने विष प्राशन केल्याने बार्शीत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले उपोषणकर्ते भाऊसाहेब निवृत्ती धवडे या परंडा तालुक्यातील आंदोलक कार्यकर्त्याच्या तब्येतीच्या चौकशीसाठी बार्शीतील रुग्णालयात आलेल्या परंडा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याने प्रहार जनशक्‍तीचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख सौदागर केदार व त्यांच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
 विजयसिंह नलवडे यांनी 

याबाबत रात्री उशिरा बार्शी पोलिसांत फिर्याद दिली आहे. धवडे हे परंडा तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्‍या विविध शासकीय योजनांसाठी परंडा पंचायत समिती कार्यालयासमोर 20 फेब्रुवारीपासून उपोषणास बसले होते. दरम्यान, उपोषणाची दखल न घेतल्याने धवडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत  त्यांना दुपारी बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे त्यांना बघण्यासाठी  रूग्णालयात  गेले होते. 

तेथे गेल्यावर हा मेल्यावर भेटायला येता का? असे म्हणून दोघांना मारहाण करण्यात आली. याबाबत नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघावर बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर करत आहेत.