Fri, Apr 26, 2019 03:58होमपेज › Solapur › तीन हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी

तीन हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:20PMबार्शी : गणेश गोडसे

शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची गैरहजेरी टाळण्यासाठी जेमतेम 3 हजार लोकसंख्या  असलेल्या बार्शी तालुक्यातील  ग्रामपंचायत कार्यालयांनाही अधिकारी व  कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशिन बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांबरोबरच कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीला चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बार्शी तालुक्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एकूण 22 गावे असून आजपर्यंत 11 गावांत बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात क्रमांक दोनचे गाव असलेल्या पांगरी, खामगाव, पानगाव, गौडगाव, बावी, कारी, खांडवी, सुर्डी, चिखर्डे, आगळगाव व कोरफळे या अकरा गावातील हजेरी बायोमेट्रीक मशीनद्वारे होत आहे. 

ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत, सलग अनेक दिवस ते ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत, ग्रामसेवक अनुपस्थित असल्यामुळे अनेक कामकाज खोळंबले आहे, अशी सतत ओरड असते. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये सतत खटके उडत असतात. बार्शी तालुक्यातील तीन हजार लोकसंख्येच्या पुढील गावात ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रीक मशीन बसवण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या तक्रारीमधील वास्तव समोर येणार आहे. 

बायोमेट्रीक हजेरी पद्धत प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी  सुरू झाल्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती समोर येण्यास मदत होणार आहे. तसेच या हजेरी पद्धतीमुळे सर्वांचीच गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. 

दांडीबहाद्दरांना बसणार आळा

काही महिन्यांपूर्वी ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेला केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने 3 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जि.प. शाळेमधील शिक्षक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामसेवक यांच्यासह अन्य कर्मचारी व अधिकार्‍यांनीही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दररोज बायोमेट्रिक यंत्रावरच हजेरी  द्यावी, असे सांगितले होते. ग्रामीण भागातदेखील अधिकारी-कर्मचारी कामांवर योग्य वेळेत येतील व जातील हा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे. 

मात्र या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांची मात्र चांगलीच पंचाईत होणार आहे. त्यांना या बायोमॅट्रिक हजेरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. सध्या बायोमेट्रिक हजेरी पद्धत ग्रामपंचायतीच्या सर्वच कर्मचार्‍यांना लागू झाली असून लवकरच जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचे कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेखाली येणार आहे.