Thu, Jul 18, 2019 14:32होमपेज › Solapur › डॉ. जवंजाळला पोलिस कोठडी

डॉ. जवंजाळला पोलिस कोठडी

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 12:04AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती  घोटाळ्यात शहर पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल  केला आहे. बनावट दस्त करून 91 लाख  रुपयांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अकलूजच्या डॉ. जवंजाळ दाम्पत्याविरुद्ध सदर बझार पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. राहुल जवंजाळ याला न्यायदंडाधिकारी श्रीमती मिस्त्री यांनी 5 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

डॉ. राहुल राजकुमार जवंजाळ आणि श्रद्धा राहुल जवंजाळ (वय 40, रा. दत्त चौक, ग्रामपंचायतशेजारी, अकलूज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डॉ. राहुल जवंजाळ यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत समाजकल्याणचे सहायक आयुक्‍त अमित मुरलीधर घवले यांनी फिर्याद दाखल केली आहे.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अकलूज या संस्थेकडून सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, अकलूज व धन्वंतरी स्कूल ऑफ नर्सिंग, अकलूज या शैक्षणिक संस्था चालविल्या जात आहेत. डॉ. राहुल जवंजाळ हे या दोन्ही संस्थांचे संचालक असून त्यांच्या पत्नी श्रद्धा जवंजाळ या संस्थेच्या बँक खाती चालवितात. जवंजाळ दाम्पत्याने सन 2011-12 ते 2015-16 या कालावधीत सहायक आयुक्‍त समाजकल्याण कार्यालय, सोलापूर येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी संगनमत करून महाविद्यालयाच्या  विविध कोर्सेसना महाराष्ट्र शासनाने विहित करून दिलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. 

या विद्यार्थ्यांचे त्याच वर्षी इनरोलमेंट करुन शिष्यवृत्तीचा लाभ घेणे क्रमप्राप्त असताना अन्य वर्षामध्ये नियमबाह्य लाभ प्राप्त करुन घेतला. एमएनसी नियमानुसार प्रवेश घेतले व नंतर परिषदेकडे इनरोलमेंट न करता विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती घेतली. अशाप्रकारे जवंजाळ दाम्पत्यानी सन 2011-12 ते 2015-16 याकालावधीत  बनावट  दस्त करून तो खरा असल्याचे भासवून त्याचा वापर करून समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती घेऊन 90 लाख 78 हजार 108 रुपयांचा अपहार केला म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डॉ. राहुल जवंजाळ यास अटक करून सोमवारी दुपारी न्यायदंडाधिकारी श्रीमती मिस्त्री यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी डॉ. जवंजाळ यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन थेटे तपास करीत आहेत.

Tags : solapur, Billions rupees scam, Dr. Javanjal, police custody,