होमपेज › Solapur › आज विजापूर जिल्हा बंदचे विविध संघटनांचे आवाहन

आज विजापूर जिल्हा बंदचे विविध संघटनांचे आवाहन

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:29PM

बुकमार्क करा

विजापूर ः वार्ताहर

अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या  अत्याचार व खून प्रकरणातील नराधमांना अटक करण्यात यावी तसेच या अमानुष घटनेच्या निषेधार्थ विविध दलित व महिला संघटना, विविध प्रगतीपर संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.23) विजापूर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती  चंद्रशेखर कोडबागी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बस वाहतूक, सिनेमागृहे, दुकाने, बंद ठेवून मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 या प्रकरणी जिल्हाभरात मूक मोर्चा, कँडल मार्च, निवेदने देऊन आक्रोश करण्याचेे काम सुरू आहे.  आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, एवढेच नव्हेतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालत सुनावणी होऊन तातडीने निकाल देण्यात यावा, त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागण्यांसाठी विविध दलित व महिला संघटना, अखिल भारत विद्यार्थी परिषद, विविध मुस्लिम संघटना, तसेच विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावतीने करण्यात येत आहे.

विविध संघटनांचा पाठिंबा शनिवारच्या बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. बसव सेनेसह भाजपचे माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी बंदला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून या निंदनीय घटनेचे कोणीही राजकारण करू नये, पोलिस वरिष्ठ अधिकार्‍यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पाप  चौकशी करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली.