Tue, Apr 23, 2019 10:14होमपेज › Solapur › ‘चल रं सर्जा बिगी..बिगी..’

‘चल रं सर्जा बिगी..बिगी..’

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 8:49PMसोलापूर : संतोष आचलारे

जिल्हा परिषदेच्या गाडीचा एक कासरा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हाती, तर दुसरा कासरा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हाती आहे. विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्या हातात चाबूक असला तरी ते चाबूक कधीच उगारत नसल्याने कासरा सैल पडला आहे. कासरा सैल असल्याने गाडीचा वेग मंदावला असल्याने आता खर्‍याअर्थाने ‘चल रं सर्जा बिगी..बिगी..’ असे  म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. 

गतवर्षी जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यात जिल्हा परिषदेला मोठे अपयश आले आहे. येत्या सहा महिन्यांत पुन्हा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या गाडीचा कासरा आता संजय शिंदे व डॉ. राजेंद्र  भारुड यांनी सैल सोडून प्रशासकीय यंत्रणेच्या सर्जा राजाला पळविण्याचे काम करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून व जि.प. सेसफंडातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो. मात्र हा निधी वेळेत खर्च होत नसल्याचे प्रशासकीय गाडीचा तोल सातत्याने ढासळत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी अपेक्षित पल्‍ला गाठण्यास जरी अपयश आले तरी किमान यंदा तरी कमी वेळेत अपेक्षित पल्‍ला गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्याची वेळ आली आहे. 

जिल्हा परिषद सेसफंडातून घेण्यात येणार्‍या 40 कोटींच्या निधीच्या योजना अजूनही कागदावरच आहेत. महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण आदी विभागांकडून घेण्यात येणार्‍या वैयक्‍तिक लाभाच्या योजना राबविण्यात आलेले अपयश पाहता यंदाच्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत तरतूद करण्यात आलेला सर्व निधी लाभार्थ्यांना देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 

मार्च महिन्यात जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. त्यानंतरच्या चार महिन्यांत आतापर्यंत चालू वर्षातील व मागील वर्षातील लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून जिल्हा परिषदेच्या गाडीवरील चाबकाची धाक दाखविण्यात काकाही पुढे सरकत नसल्याने ही बैलगाडी डुलतडुलत जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी डिसेंबर महिन्यात लागणारी आचारसंहिता गृहित धरुन जि.प. अध्यक्ष संजय शिंदे व सीईओ डॉ. राजेद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या गाडीचा कासरा सैल सोडून बैलगाडी पळविण्याची तातडीची गरज आहे. तरच त्यांना काहीतरी भले केल्याचे समाधान मिळणार आहे.