Sun, Jul 21, 2019 08:41होमपेज › Solapur › स्वच्छतेबाबत कोटींच्या कोटी बक्षिसे : मुख्यमंत्री

स्वच्छतेबाबत कोटींच्या कोटी बक्षिसे : मुख्यमंत्री

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:38PM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी करतानाच राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा व स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रमे शहरांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची घोषणाही केली. 

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 चा आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमतून राज्यातील महापालिका, नगरपालिकांचे पदाधिकारी, अधिकार्‍यांनी संवाद साधला. सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नगरपालिकांचे  नगराध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित होते.  नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा  म्हैसकर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी  विविध जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून स्वच्छता अभियानाच्याप्रगतीची माहिती घेतली.

येत्या 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी याकालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परिक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डांना दर्जानिहाय अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 20 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.  नगरपरिषदांसाठीदेखील  दर्जानिहाय  बक्षिसे दिली जाणार आहेत. 

तसेच शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना20कोटी तर, 4 ते10 क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना 15 कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्‍चिम विभागीय गुणानुक्रमात येणार्‍यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या 3 क्रमांकात येणार्‍या शहरांना 15 कोटी, 4 ते 10 क्रमांकामध्ये येणार्‍यांना 10 कोटी, तर 11 ते 50 क्रमांकामधील शहरांना 5 कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत यावर्षी राज्यातील शहरांचा  गुणानुक्रम     वाढण्यासाठी     प्रयत्न करावेत. 

अमृत योजनेतील जास्तीत जास्त शहरे यंदा पहिल्या शंभर क्रमांकामध्ये यावीत यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा तसेच सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रियांना महत्त्व असल्यामुळे यासंबंधीचे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांनी वापरून आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. यासाठीही प्रयत्न करावेत. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी बैठका घेण्यात याव्यात.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये चांगले गुणानुक्रम न मिळविणारे, शहरातील  80 टक्के  कचरा  विलगीकरण न करणारे व कचर्‍याचे कंपोस्ट खत तयार न करणार्‍या शहरांना राज्य शासनामार्फत अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही. पुढीलकाळात शहरांच्या कामगिरीनुसारच अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.