होमपेज › Solapur › विडी कामगारांना आता पंधरवड्याला वेतन

विडी कामगारांना आता पंधरवड्याला वेतन

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 9:17PMसोलापूर ः वेणुगोपाळ गाडी

दरमहा बँक खात्यावर होणार्‍या वेतनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार्‍या सोलापूरच्या विडी कामगारांना आता दर पंधरवड्याला वेतन करण्याची पद्धत एका कारखानदाराकडून सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत उर्वरित कारखानदारदेखील या नवीन पद्धतीची अंमलबजावणी करणार असल्याने विडी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सव्वा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर विडी उद्योगातील कामगारांना दर आठवड्याला रोखीने मजुरी देण्याची पारंपरिक पद्धत बंद करून त्यांचे वेतन दरमहा बँक खात्यावर करण्याची नवी पद्धत सुरू करण्यात आली होती. मात्र, ही नवी पद्धत अशिक्षित असलेल्या सुमारे 70 हजार विडी कामगारांना गैरसोयीची व जाचक ठरत आहे. हातावर पोट असलेल्या या विडी कामगारांना उधारीवर किराणा माल आदी जीवनावश्यक वस्तू खरेदी करावी लागते. पूर्वी या उधारीची परतफेड रोख मजुरीमुळे दर आठवड्याला करणे सोयीचे होते, मात्र दरमहा आणि ते बँक खात्यावर होणार्‍या वेतनामुळे विडी कामगारांची अक्षरश: ससेहोलपट होत आहे. दर महिन्याला बँकेत तिष्टत थांबत, गयावया करीत कोणाकडून तरी स्लीप भरून घेऊन वेतन घेऊन जाणे कामगारांना जिकिरीचे ठरत आहे.  कामगार संघटनांनी ही पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे दर आठवड्याला रोखीने मजुरी करण्याची मागणी उचलून धरली आहे, मात्र, याबाबत काही अडचणी असल्याने विडी कारखानदार या मागणीची पूर्तता करू शकत नाहीत. 

या पार्श्‍वभूमीवर साबळे-वाघिरे विडी कंपनीचे मालक तथा व्यवस्थापकीय संचालक अरुण साबळे यांनी विडी कामगारांना दिलासा देण्यासाठी गत महिना म्हणजे जानेवारीपासून दर 15 दिवसांनी कामगारांच्या बँक खात्यावर वेतन करण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. अशीच पद्धत सोलापुरातील सर्वच कारखानदारांनी सुरू करावी, याकरिता सोलापूर विडी उद्योग संघाची बैठकही घेण्यात आली आहे. 

अरुण साबळे यांच्या मालकीचे साबळे-वाघिरे कंपनी, साबळे टोबॅको कंपनी तसेच शिवशक्‍ती एंटरप्रायजेस हे तीन फर्म असून यामध्ये काम करणार्‍या सुमारे 12 हजार कामगारांना पंधरवड्याच्या वेतन पद्धतीचा लाभ होत आहे. एकंदर या निर्णयाची सर्व कारखानदारांनी अंमलबजावणी केल्यास विडी कामगारांच्या अडचणी काही प्रमाणात सुटण्यात मदत होईल.