Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात भीमा नदी कोरडी

पंढरपूर तालुक्यात भीमा नदी कोरडी

Published On: Mar 14 2018 10:08PM | Last Updated: Mar 14 2018 9:46PMपंढरपूर : प्रतिनिधी 

मुंबईत झालेल्या बैठकीत उजनीचा डावा, उजवा कालवा, माण व सीना नदीमध्ये 15 मार्चपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बाब स्वागतार्ह आहे, मात्र भीमा नदी कोरडी पडल्याने नदीवर अवलंबून असलेली हजारो एकर पिके धोक्यात आली आहेत. त्यासाठी कालव्यासोबत भीमा नदीलाही पाणी सोडावे अशी मागणी भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांतून होत आहे. त्याअनुषंगाने शेतकर्‍यांनी आंदोलनाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

गुरूवार दि. 8 मार्च रोजी मुंबई मंत्रालयात उजनी पाणी सोडण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत सिंचनासाठी उजनीच्या उजव्या व डाव्या कालव्यातून व माण, सीना नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे उजनीच्या दोन्ही कालव्यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सीना व माण नदीकाठच्या शेतकर्‍यांची पिकेही उन्हाळ्यात  जगणार आहेत. मात्र भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय  त्या बैठकीत  घेण्यात आला नाही.

भीमा नदीचे पात्र गेल्या  15  ते 20 दिवसांपासून कोरडे पडले आहे. नदीपात्रात असलेल्या खड्ड्यांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यामध्ये वाढीव पाईपा टाकून शेतकरी आपली उभी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत नदीमध्ये पाणी सोडताना सोलापूर, पंढरपूर शहराला पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे का? याचा विचार केला जातो आणि त्यानंतर उजनीतून भीमेत पाणी सोडले जाते. विशेष म्हणजे भीमा नदीलाही कालव्याचा दर्जा असून बंधार्‍यावरील शेतकर्‍यांकडून पाणी पट्टी वसूल केली जाते. त्यांना पाणी वापर परवाने दिलेले आहेत. असे असताना भीमा नदीला पाणी सोडताना पिकांचा, पाणी वापर परवान्याचा विचार केला जात नाही. तर सोलापूर आणि पंढरपूर शहरे केंद्रीभूत ठरवून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर केले जाते. सध्या भीमा नदीतील बहुतांश बंधारे कोरडे पडलेले आहेत आणि उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नदीकाठची पिके पाण्यासाठी आलेली आहेत. मात्र सोलापूरला पाणी सोडण्याचा निर्णय झालेला नाही त्यामुळे भीमा नदीला पाणी कधी सोडले जाणार हे अद्यापही अनिश्‍चीत आहे. सोलापूरच्या पाणी पुरवठा  बंधार्‍यात किमान 15  दिवस पुरेल इतके  पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आणखी आठ-दहा दिवस तरी भीमेतून पाणी सोडण्याचा निर्णय होईल अशी शक्यता नाही. तोपर्यंत नदीकाठच्या शेतकर्‍यांनी पिके जगतील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. भीमा नदीला तातडीने पाणी नाही सोडले तर हातातोंडाला आलेली पिके जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे नदी काठच्या शेतकर्‍यांमधून संताप व्यक्‍त होत आहे.दरम्यान यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भीमा नदीकाठच्या गावांतून बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. तर कुरूल जि.प.गटाच्या सदस्या सौ. शैला गोडसे यांनीही तातडीने भीमा नदीतून पाणी सोडा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. यामुळे  भीमा नदीला कधी पाणी सोडले जाते याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. 

शासनाच्या धोरणानुसार  भीमा  नदीला कालव्याचा दर्जा आहे. त्याच आधारावर भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांना पाणी वापर परवाने दिले आहेत. त्यांच्याकडून पाणी पट्टी वसुल केली जाते. कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन केले असताना भीमा नदीतून पाणी सोडण्याचा विचार का झाला नाही हा प्रश्‍न आहे. कालव्याबरोबरच भीमा नदीलाही पाणी सोडले जावे. अन्यथा नदीकाठच्या सर्व शेतकर्‍यांना एकत्रित करून पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.

सौ. शैला गोडसे, कुरूल  जि.प. सदस्या

सोलापूर महानगरपालिकेचे पाणी सोडण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाला मिळाले आहे. पंढरपूरचे अद्याप मिळाले नाही. मात्र नदीवर अवलंबून असणार्‍या पाणीपुरवठा योजना, नगरपालिका या सगळ्यांचा समन्वय साधून पाटबंधारे विभागाचे अधिकारी व त्या त्या नगरपालिकांचे अधिकारी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लक्षात घेऊन योग्यवेळी पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल.

शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सोलापूर