Tue, Jul 23, 2019 11:12होमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव प्रकरण : दगडफेकप्रकरणी १७ जणांवर गुन्हा 

भीमा-कोरेगाव प्रकरण : दगडफेकप्रकरणी १७ जणांवर गुन्हा 

Published On: Jan 06 2018 1:29AM | Last Updated: Jan 05 2018 8:56PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या बंदला सायंकाळी शहरात गालबोट लागले. शहरातील मंगळवेढा रस्ता आणि सम्राट चौकात एस.टी. बसेसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात 17 जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्यावतीने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेत असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर राज्यातील जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. हे होत असताना सोलापुरात सायंकाळी सहाच्या सुमारास दोन एस.टी. बसेसवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे दिवसभर शांततेत सुरु असलेल्या बंदला गालबोट लागले.

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमोल प्रकाश कांबळे (वय 24, रा. जवळकर वस्ती, आडवा नळ, सोलापूर), लखन हलकवडे, नेता शेंडगे, वाघमारे व इतर तिघे (रा. सम्राट चौक, सोलापूर) यांनी केलेल्या दगडफेकीत एस.टी. बसची काच फुटून 7 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चालक बापू नामदेव माने (वय 52, रा. अण्णाभाऊ साठेनगर, मोहोळ, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जमादार तपास करीत आहेत.

तर दुसर्‍या घटनेत मंगळवेढा रस्त्यावरील रिलायन्स मार्केटसमोरील रस्त्यावरुन जाणार्‍या एस.टी. बस क्र. एमएच 14 बीटी 3375 यावर धनराज कमलाकर दंदाडे (वय 33, रा. हब्बू वस्ती, देगाव नाका, सोलापूर), दादा कांबळे (रा. थोबडे वस्ती, सोलापूर), अजय सिध्दगणेश (रा. आमराई, सोलापूर), शुभम भालेराव (रा. आमराई), अजय शिंदे (रा. हब्बू वस्ती, सोलापूर), क्षितीज (रा. आमराई), रणजित जोंजट (रा. आमराई), आदित्य शिंदे (रा. आमराई), तथागत मस्के (रा. आमराई) यांनी दगडफेक करुन एस.टी. बसचे 7 हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत चालक भैरू कृष्णा माळी (वय 54, रा. अंकोली, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.