Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Solapur › महावितरण कार्यालयात प्रहारचे भजन आंदोलन

महावितरण कार्यालयात प्रहारचे भजन आंदोलन

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:52PM

बुकमार्क करा

करमाळा : प्रतिनिधी 

करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहर परिसरातील कृषी पंपांची वीज कनेक्शन तोडणी वीजबिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनी, करमाळा यांच्या माध्यमातून तोडण्यात आलेली आहे. ही बाब बेकायदेशीर असून शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित करावी, या प्रमुख मागणीसह वीज वितरण कंपनीच्या विविध मागण्यांसाठी आज करमाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने भजन आंदोलन सुरू केले.

या आंदोलनामध्ये सर्व शेतकरी कार्यालयामध्ये बसून हातामध्ये टाळ, मृदूंग घेऊन भजन करत आंदोलन करत आहेत. जोपर्यंत आपल्या शेतावरील शेती पंपांची वीज पूर्ववत सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा निर्धार या शेतकर्‍यांनी केलेला आहे. प्रहार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी कृषी पंपांचे वीजबिल न भरल्यामुळे प्रत्येक गावातील डी.पी. वरील ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून ठेवण्याचे काम कंपनीकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या शेतकर्‍यांच्या शेतावर उभी पिके जळून जात असून विहिरीमध्ये पाणी असतानासुध्दा ते पिकांना देता येत नाही. त्याचबरोबर काही भागामध्ये लोड शेडींगचा प्रश्‍न गंभीर असून सलग 24 तासांपैकी एक तास सुध्दा वीज सुरळीतपणे शेतकर्‍यांना मिळत नाही. याशिवाय विविध कामांसाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जात असल्यामुळे या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे. या आंदोलनात माजी चेअरमन रामदास विठ्ठल खाडे, पं.स. सदस्य विलास बन्सी मुळे, प्रहारचे मीडिया प्रमुख विकी मोरे, पं.स.चे माजी सदस्या सरस्वती केकान, उमाकांत केकान, आदिनाथ रासकर, नवनाथ सोलनकर, दादा पाटोळे, प्रल्हाद सोलनकर, आप्पा सोलनकर, गोटू केकान, नामदेव केकान, मच्छिंद्र बुधवंत, विष्णू गर्जे, कैलास सोलनकर, नामदेव बुधवंत, डॉ. गोरे, गोरख पवार, सोमनाथ पवार, विजय पखाले, भाऊसाहेब दौंडे, ईश्‍वर दौंडे, दत्तात्रय पवार आदींसह दिवेगव्हाण, रावगाव, लिंबेवाडी, राखवाडी, श्रीदेवीचा माळ येथील शेतकरी सहभागी झालेले आहेत.

याठिकाणी करमाळा पोलिस स्टेशनचे पो.नि. राकेश देवरे यांच्यासह पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उभे असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी वीज बिले भरून सहकार्य करावे, अशा सूचना दिलेल्या होत्या. मात्र, मुदत देऊन सुध्दा शेतकर्‍यांनी वीजबिल न भरल्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शेतकर्‍यांचे कनेक्शन बंद करण्यात आले होते. शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीला सहकार्य करून आंदोलन थांबवावे, अशी विनंती लेखी पत्राद्वारे उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि. वितरण कं.लि., सं.व.सु. उपविभाग, करमाळा यांनी दिलेले आहे.