Wed, Apr 24, 2019 12:29होमपेज › Solapur › 29 लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागिरांचे पलायन

29 लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागिरांचे पलायन

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:02PMसांगोला : तालुका प्रतिनिधी 

शहरातील सराफांनी बंगाली कारागिराकडे चोख दागिने बनविण्यासाठी दिलेले सुमारे 29 लाख 49 हजार रुपये किमतीचे 983 ग्रॅम शुद्ध सोने विश्‍वासघात करून त्याने कामगारासह पलायन केले आहे. हा प्रकार 11 एप्रिल रोजी सकाळी 6 च्या सुमारास उघडकीस आला.  मागील 18 वर्षे  विश्‍वास संपादन करून सांगोल्यातील 18 सराफांना बंगाली कारागिराने मोठा गंडा घातल्याने सांगोला शहर व तालुक्यातील सराफ, सुवर्णकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

हबीब मोसीयार मुल्ला (वय 35, मूळ रा. भोरमपूर, जि. हुगली, पश्‍चिम बंगाल, सध्या रा. कोष्टी गल्ली, सांगोला) असे बंगाली कारागिराचे नाव आहे. बंगाली कारागीर हबीब मुल्ला व त्याचा भाऊ सरफूर मुल्लासह इतर दहा ते बारा जणांनी मिळून सांगोला शहरातील सरताज तांबोळी यांच्या घरी भाड्याने खोली घेवून मागील 18 वर्षांपासून शहरातील सराफांकडून शुद्ध सोने घेऊन ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून देण्याचे काम करीत होते. शहरातील गुलाब शिंदे यांनी 4 एप्रिल रोजी दु.12 च्या सुमारास हबीब मुल्ला याच्याकडे 137 ग्रॅम शुध्द सोन्याचा तुकडा दिला होता. तो त्याचे दागिने बनवून काल दि.11 एप्रिल रोजी परत देणार होता. दरम्यान गुरुवारी गुलाब शिंदे सकाळी 6 च्या सुमारास कोष्टी गल्लीतून जात असताना हबीबने दागिने तयार झाले आहेत का हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी हबीब मुल्ला सह कोणीही दिसून आले नाही. त्यानंतर गुलाब शिंदे यांनी त्याचे इतर काही कामगार काम करीत असणार्‍या ठिकाणी संतोष महामुनी, शनी गल्ली येथे जाऊन पाहिले असता त्याठिकाणी कोणीही कामगार मिळून आले नाही. 

दरम्यान हबीब मुल्ला याने गुरुवारी दिवसभर इतर सराफांकडून दागिने बनवून देतो, म्हणून 846 ग्रॅम सोने जमा केले होते. नेहमीप्रमाणे हबीब या सोन्याचे दागिने तयार करून देणार असल्याने सराफांनाही शंका येण्याचे काही कारण नव्हते. याबाबत गुलाबराव मच्छिंद्र शिंदे रा.जिव्हाळा कॉलनी, वासूद रोड, सांगोला यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीसांनी हबीब मोसियार मुल्ला याच्यासह दहा ते बाराजणांविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि.राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमुल कादबाने करीत आहेत.