होमपेज › Solapur › कर्जमाफीचा जिल्ह्यातील सव्वालाख शेतकर्‍यांना लाभ

कर्जमाफीचा जिल्ह्यातील सव्वालाख शेतकर्‍यांना लाभ

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:33PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 365 शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. लीड बँक अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफी योजनेतून 2 लाख 20 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, यात जवळपास सव्वालाख शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. यात 700 कोटींची कर्जमाफी झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना सर्वाधिक 428 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. 
शेतकर्‍यांना खरीप पिकासाठी पीककर्ज वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गतकाळापेक्षा यंदाच्या वर्षी 

जिल्ह्यातील 32 बँकेच्या 545 शाखेतून 770 कोटींचे पीककर्जाचे वाटप झाले आहे. यात कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कामकाज चांगले आहे. मात्र कॅनरा आणि बँक ऑफ बडोदा बँकेचे पीककर्ज वाटपात असमाधानकारक काम असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार आढावा बैठकीत सर्व बँकांना पीककर्जाच्या वाटपासंदर्भात सूचना दिल्याचे सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीककर्ज वाटपात चांगले काम केले असून 63 टक्के कर्जवाटप केल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. 

ऑगस्ट महिन्यात 770 कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. आता सप्टेंबर महिनाअखेर 907 कोटींचे कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत 65 टक्के पीककर्ज वाटप झाल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

एकाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत 

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक  बुधवारी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्‍तांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यात सहा प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. त्यात मंगळवेढा तालुक्यातील सोनाली दत्तात्रय पवार, दक्षिण सोलापूरमधील विश्‍वनाथ रामचंद्र चिक्‍कळी, नागनाथ कल्लप्पा राऊतराव यांना आर्थिक मदतीपासून अपात्र ठरविले. बार्शी तालुक्यातील रूपेश उत्तम लोंढे यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बार्शी तालुक्यातील रामलिंग रंगनाथ डोके, माढा तालुक्यातील संजय अभिमान गायकवाड यांच्या प्रकरणाच्या फेरतपासणीचा निर्णय झाला आहे.