Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Solapur › ‘स्मार्ट सिटी’मधील भिकारी पुन्हा बेघर

‘स्मार्ट सिटी’मधील भिकारी पुन्हा बेघर

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:38PMसोलापूर : इरफान शेख

  सोलापूर शहरात गेल्या एक महिन्यापासून भिकारी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नॅशनल अर्बन लायव्हलीहूड मिशन (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) अंतर्गत यांची व्यवस्था करण्यात येते. परंतु गेल्या एक महिन्यापासून येथील पुनर्वसन केलेल्या भिकार्‍यांना एक वेळचेही जेवण उपलब्ध होत नसल्याने त्यांनी पुुन्हा रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर महापालिकेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या  भवानीराम सिकची धर्मशाळा येथे बेघर, फुटपाथ, पार्किंगच्या जागेवर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिर व  दर्गाहसमोर भीक मागणार्‍यांना नॅशनल  अर्बन  लायव्हलीहूड मिशन (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) अंतर्गत त्यांच्या  राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून येथील पुनवर्सित केलेल्या भिकार्‍यांसाठी एकवेळचे जेवणसुध्दा आले नाही. 

सिकची धर्मशाळेत 9 भिकारी
भवानीराम सिकची धर्मशाळेत सध्या 9 भिकारी राहतात. काही काळापुरती प्रशासनाकडून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु गेल्या एक महिन्याभरापासून  नाश्ता व जेवण न आल्याने त्यांना पुन्हा रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे.

योजनेचा उडाला फज्जा
भारत सरकारच्या योजनेनुसार कोणतीही बेघर व बेसहारा व्यक्‍ती फुटपाथवर झोपू नये, उपाशीपोटी राहू नये, परंतु या योजनेचा पूर्ण फज्जा उडाला आहे. ही योजना राबविण्यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यावरच भिकार्‍यांना पोटभर  अन्न मिळेल. सरकारी योजनेचा भरोसे राहिल्यामुळे पुन्हा उपासमार येण्याची वेळ आली आहे.

धर्मशाळेत सुरक्षा वार्‍यावर
सद्यस्थितीला रेल्वे स्टेशनसमोरील धर्मशाळेत एकही महिला भिकारी राहत नाही. मुबलक सुरक्षाव्यवस्था नसल्याने महिला भिकारी राहण्यास धजत नाहीत.
सध्या राहात असलेले भिकारी फक्‍त रात्री झोपण्यासाठी भवानीराम सिकची धर्मशाळेत  येतात. दिवसभर रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड, शहरातील  वेगवेगळ्या चौकांत, मंदिर व दर्गाहसमोरील परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरण्यासाठी जातात.

गर्दीच्या ठिकाणी भिकार्‍यांची संख्या वाढली
रेल्वेस्थानक व  एस.टी. स्टँड येथे भीक मागणारे पुरुष व स्त्रिया अधिक दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या अशा भिक्षुकांची व्यवस्था करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सज्ज नाही. रात्रीच्या वेळी महिला भिक्षुकांवर कोणतेही संकट येण्याची भीती आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर महिला व पुरुष भिक्षुक असतात.

रेल्वे स्टेशनमध्ये चेंगराचेंगरीचा धोका
रेल्वेस्थानकात हुतात्मा एक्स्प्रेस व इंद्रायणी आल्यावर मोठी गर्दी होते. या गर्दीमध्ये पैसे मागणारे आडवे येत असतात. प्लॅटफार्म 1 वरुन 2, 3 व 4  वर जाण्यासाठी असलेल्या पादचारी पुलावरदेखील बेघर असलेले महिला व पुरुष झोपलेले असतात. प्रवासी त्यांना ओलांडून अडखळत जात आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे.