होमपेज › Solapur › निवडणुकीपूर्वीच आ. भालकेंना काँग्रेसचे मंत्रिपदाचे आमिष

निवडणुकीपूर्वीच आ. भालकेंना काँग्रेसचे मंत्रिपदाचे आमिष

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:30PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनामी लाट आणि त्यांची पंढरपुरात सभा होऊनही सलग दुसर्‍यावेळी निवडून आलेल्या आ. भारत भालके यांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना थेट मंत्रिपदाचे आमिष दाखवून नामदारकीची ऑफर दिली आहे. त्यामुळे आ. भालके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 2014 मध्ये राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पराभूत झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी घेऊन आ. भालके सलग दुसर्‍या वेळी विजयी झालेले आहेत. सत्ता गेल्यानंतरही आ. भालके यांंनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत केलेली आहे. आजघडीला आ. भालके हमखास विजयी होतील, अशी गणिते मांडली जाऊ लागली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर गुरूवार (10 मे) रोजी सरकोली (ता.पंढरपूर) येथे आ. भारत भालके यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे प्रमुख उपस्थित होते. हे चारही नेते राज्यातील काँग्रेसचे सध्याचे प्रमुख नेते आहेत. या नेत्यांनी आ. भालके यांचे मुक्तकंठाने कौतुक करताना त्यांच्या विधानसभेतील कामगिरीचे, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्‍नासाठी केलेल्या संघर्षाचे, त्यांच्या लोकसंपर्काचे गोडवे गायले. आ. भालके हे काँग्रेसचे आमदार जरी असले तरी त्यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे. तांत्रिकदृष्ट्या  भालके काँग्रेसमध्ये असले तरी मनाने खा. पवारांसोबत असतात, त्यामुळे उद्या जागेसाठी रस्सीखेच झालीच तर भालके राष्ट्रवादीमध्ये जातील याची जाणीव काँग्रेस पक्षश्रेष्ठींना झाल्याचे दिसून येत आहे.

एकाच वेळी आ. भालके काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अतिशय जवळीक साधून आहेत,  हे लक्षात घेऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचाही आ. भालके यांच्यावर डोळा आहे. यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात होती आणि ती सातत्याने राष्ट्रवादीने जिंकलेली आहे. 2014 मध्ये आ. भालके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही जागा जिंकली होती. दोन्ही पक्ष वेगळे झाल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागले होते. मात्र पुन्हा ही जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आ. भालकेंनाच हायजॅक करू शकते, हे हेरून काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांना  मंत्रिपदाचे आमिष दाखवल्याचे बोलले जात आहे. यावेळी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2013 मध्ये राज्य सरकारचा विस्तार करतेवेळी आ. भालके यांचे  मंत्रीपदाच्या यादीत नाव होते, मात्र त्यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट केला. चारही प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणात वारंवार आमदार भालके यांना नामदार करू, असे आमिष दाखवल्याचे दिसून येत आहे. आ. भालके राष्ट्रवादीत गेल्यास मंत्रीपदासाठी तिथे पहिलेच ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे तिथे मंत्रीपदाची संधी मिळणे कठीण दिसते आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहणेच मंत्रीपदाच्यादृष्टीने सोयीस्कर असल्याची सूचक ऑफर काँग्रेसच्या नेत्यांनी आ. भालके यांना दिली आहे.  या सत्कार समारंभानंतर संपूर्ण मतदारसंघात आ. भालके आता मंत्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या  आहेत.  तसेच आ. भालके समर्थकांतूनही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.