होमपेज › Solapur › आरोग्य केंद्रात वेळेत हजर रहा, अन्यथा बडतर्फ 

आरोग्य केंद्रात वेळेत हजर रहा, अन्यथा बडतर्फ 

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 15 2018 10:48PMसोलापूर : प्रतिनिधी

आपण ज्या आरोग्य केंद्रात काम करतो, तेथील घाणीत काम करणे ही दुर्दैवाची बाब आहे. नैसर्गिक विधीसाठी साधे शौचालयाची सुविधा निर्माण करण्यात येत नाही, ही शरमेची बाब आहे. डॉक्टरांनी व आरोग्य सेवकांनी दिलेल्या वेळेत ड्रेसकोडमध्ये व ओळखपत्र परिधान करून कामास उपस्थित रहावे. जे नियम पाळणार नाहीत, त्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई करू, असा इशारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला. 

जिल्हा परिषदेतर्फे मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात आरोग्य मंथन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, जि.प. सदस्य उमेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. विकास सरवदे, जिल्हा शल्यचिकीत्सक सुदीप अणदूरकर आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. भारुड म्हणाले, मी बेशिस्त शिक्षकांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. आज बडतर्फ झालेल्या शिक्षकांचे कुटुंब माझ्या दारात येते, मात्र मी कारवाई मागे घेत नाही. आरोग्य विभागातही 90 टक्के चांगले काम आहे. मात्र दहा टक्के बेफिकीर कर्मचार्‍यांमुळे बदनामी होत आहे. कर्मचारी व डॉक्टरांनी मुलभूत नियम पाळणे आवश्यक आहे. जे नियम पाळणार नाहीत, अशांवर थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल. 

आरोग्य केंद्रात शौचालय बंद असतील, तर किरकोळ दुरुस्ती मधून ते सुरु करण्यात यावेत, नवीन शौचालयांची गरज असेल तर तसा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, यासाठी निधी देण्यात येईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत पंधरा दिवसांत सर्व दवाखान्यात शौचालयांची सुविधा असणे आवश्यक आहे. दवाखान्यात सर्वत्र स्वच्छता असणे आवश्यक आहे. या बाबी दिसून आले नाही, तर कारवाई अटळ असल्याचे भारुड यांनी सांगितले. 

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी प्रास्ताविक करून आरोग्य विभागाच्या कामाची माहिती दिली. जि.प. सदस्य उमेश पाटील यांनी डॉक्टरांचे मोबाईल क्रमांक प्रत्येक दवाखान्यात फलकावर लावण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आरोग्य खात्याकडून ज्या चांगल्या बाबीसाठी निधीची गरज आहे, त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

प्रारंभी आयएसओ मानांकन मिळवलेल्या 15 आरोग्य केंद्र व 35 उपकेंद्रातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा सन्मान प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला. विविध योजनेत चांगले काम असणार्‍या डॉक्टर व कर्मचार्‍यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवक उपस्थित होते. या बैठकीस कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेले अनेक डॉक्टर दांडी मारल्याचे दिसून आल्याने डॉ. भारुड यांनी या डॉक्टरांना नोटिसा देण्याचे आदेश दिले.