बार्शी : प्रशांत घोडके
संपूर्ण देशात, राज्यात नववर्षाचे स्वागत विविध विधायक कार्यक्रम व उपक्रमाने होत असताना बार्शीच्या संकल्प ग्रुप राजस्थानी महिला मंडळाच्यावतीने गर्भवती गायीचे डोहाळ पूजन करुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याविषयी माहिती अशी की, मानवी जीवनात गर्भवती महिलेचा डोहाळ पूजन व भोजन असा सन्मानाचा कार्यक्रम घेतला जातो. जनावरांचा सन्मान व्हावा यासाठी बैलपोळा, गोबारस साजरी केली जाते. डोहाळ पूजन व भोजन कार्यक्रमाने होणार्या अपत्यावर चांगले संस्कार घडले जातात. माणुसकीची भावना रुजवली जाते. हेच संस्कार गर्भवती गायीच्या अपत्यावर व्हावेत या व्यापक उद्देशाने संकल्प ग्रुप राजस्थानी महिला मंडळाच्यावतीने नुकताच गर्भवती गायीचा डोहाळ पूजन हा अनोखा उपक्रम घेऊन नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
शहरातील चांडक मळ्यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी शहर परिसरात सुमारे पन्नास महिलांचा सहभाग होता. यावेळी या महिलांनी गाय-वासरांना पाण्याने आंघोळ घालून विधीवत पूजन करीत हार, साडी, ओढणी, पांघरत सजवून त्यांचा सन्मान केला. गायीला साडी-चोळीचा आहेर देत नामकरण करण्यात आले. अपंग गायीचेही साडी-चोळीने ओटीभरण करण्यात आले. एका वासराचे तुलादान करून त्याच्या वजनाएवढे पशूखाद्य जवळच्या गोशाळेत देण्यात आले. शाळा क्रमांक तीन 3,14,17 यामधील विद्यार्थ्यांना फळे, बिस्किटासह गणवेश वाटप करण्यात आले. रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी राजकुमारी चांडक, विद्या हेड्डा, शकुंतला सोमाणी, स्वप्ना लाहुटी, छाया सोमाणी, शकुंतला लोहे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 50 महिलांनी सहभागी होत विशेष परिश्रम घेतले.