Fri, Apr 26, 2019 18:10होमपेज › Solapur › ऊसदर, रस्ता आंदोलनामुळे गाजले सरते वर्ष

ऊसदर, रस्ता आंदोलनामुळे गाजले सरते वर्ष

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:13PM

बुकमार्क करा

बार्शी ः गणेश गोडसे

ऊसदर, रस्त्यांचे रखडलेले काम, हमीभाव याप्रकरणाच्या आंदोलनासह अडत व्यापार्‍यांचा बेमुदत संप, मोर्चे, खुनांची मालिका, दरोडे, चोर्‍या आदी नकारात्मक बाबींनी बार्शी तालुक्याच्या बाबतीत सरते वर्ष गाजले.  नोटाबंदीचा अजूनही फटका नोटाबंदीमधून सामान्य माणूस  अजूनही सावलेला दिसत नाही. बाजारपेठेत म्हणावा असा उठाव नसल्यामुळे व्यापार्‍यांबरोबरच सर्वसाधारण नागरिकही मोठ्या समस्यांचा सामना करून दिवस पुढे ढकलत होते. जीएसटी या गोंडस नावामुळे अनेकांना चांगलीच भोवळ आणली असल्याचे चित्र निदर्शनास येत होते. व्यापारी, दुकानदार, मोठे व्यावसायिक यांच्यामधून जीएसटीची बंधने त्रासदायक ठरत असल्याचा सूर  उमटताना दिसत होता.

 थेर सरपंच निवड  गतवर्षी सरळ जनतेमधून सरपंच निवडीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सर्व प्रथमच राबवल्याने ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामपातळीवर मोठी रस्सीखेच झाली होती. निवडणुका पार पडलेल्या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. गावपातळीवर दिवाळी जोरात साजरी झाली होती. या निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली, ही बाब उल्लेखनीय आहे. 
 ऊसदराचे उग्र आंदोलन  ऊसदरासाठी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांनी ऊसदराच्या वाढीसाठी तीवृ आंदोलने करून वातावरण गरम केले होते. संघटनांच्या  आंदोलनाच्या पावित्र्यामुळे प्रशासन व कारखाना व्यवस्थापकांची मोठी धावपळ सुरू होती.

 चित्रपट क्षेत्रातील कामगिरी बार्शी शहरातील अभय चव्हाण या नवख्या व उमद्या तरूणाचा ‘चरणदास चोर’ या चित्रपटासह  इतर अनेक चित्रपटांत झालेला दमदार प्रवेश हा बार्शीकरांसाठी एक सुखद धक्का ठरला आहे. बार्शीकर जनता अभय चव्हाण या युवकाकडे नामांकित कलाकार म्हणून पाहात  आहे.  जलयुक्त शिवारचे यश मळेगाव, सावरगाव (का), आगळगाव या बार्शी तालुक्यातील गावांमधील कारभार्‍यांनी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी राबवून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अडवून जमिनीमध्ये मुरवत उत्तम पद्धतीने जलसंवर्धन केले आहे. या उपक्रमाची दखल जिल्हा  अधिकार्‍यांसह राज्याच्या मंत्र्यांनी घेतली. गावात येऊन ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. 

 बसचालकांचा संप ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप, त्यामुळे सामान्य जनतेची ऐन सणासुदीच्या दिवसांत झालेली धावपळ, खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची गरज ओळखून केलेली अमाप लूट या घटना गतवर्षात लक्षवेधी ठरल्या.  शासकीय कारवाई बार्शी पंचायत समितीकडून कामात हयगय करणार्‍या, शासकीय कार्यालयात वेळेत हजर न राहणार्‍या, कर्तव्यावर  असताना बेजबाबदार वर्तन करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांवर करण्यात आलेली वेतन वाढ बंद, बदली आदी कारवायांमुळे  सरते वर्ष कर्मचार्‍यांना चांगलेच घातक ठरले.गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केलेली धाडसी कारवाई जिल्ह्यात लक्षवेधी ठरली. बार्शी पंचायत समिती राष्ट्रवादी गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी पंचायत समिती बैठकीत पंचायत समिती सदस्यास विधानपरिषदेत मतदानाचा हक्क देण्याबाबत मांडण्यात आलेला लक्षवेधी ठराव यामुळेही सदस्यांमधून  आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 
चिखर्डे येथील विषबाधित शेतकर्‍याचा झालेला दुर्दैवी मृत्यू, चारे येथील विषबाधित शेतकर्‍याचा सुदैवाने वाचलेला प्राण यामुळेही संपूर्ण सोलापूर जिल्हा ढवळून निघाला होता.