होमपेज › Solapur › बार्शी तालुक्यातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर 

बार्शी तालुक्यातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर 

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 29 2018 12:12AMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

रविवारी, 27 मे रोजी पार पडलेल्या बार्शी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. बार्शी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती पार पडल्या होत्या. सहा ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी जाहीर झालेली पोटनिवडणूक यापूर्वीच अविरोध पार पडली होती. 

चिंचोली, जामगाव येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.स्थानिकांनी आपल्या प्रतिष्ठेची केलेल्या व साठवण तलावाच्या कारणावरून बहिष्कार टाकलेल्या चिंचोली ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोन्ही विजयी उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मोठ्या फरकाने हरवले. प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्या लढतीत राजश्री गोरोबा ढेंबरे यांनी उज्ज्वला बालाजी ढेंबरे यांचा तब्बल 102 मतांनी पराभव केला. 

प्रभाग क्रमांक 3 मध्ये सखुबाई मधुकर कसबे यांनी प्रमिला रामलिंग खुने यांचा 146 मतांनी दणदणीत पराभव केला. येथे 7 मतदारांनी नोटा अधिकार वापरला. कळंबवाडी (आ) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या पोटनिवडणुकीत जयदेवी भगवान उमाप यांनी पूजा अशोक नागरगोजे यांचा 122 मतांच्या फरकाने पराभव केला. तेथे 6 मतदारांनी नोटाचा वापर केला. कळंबवाडी (आ) येथे 86.93 टक्के मतदान झाले होते.

जामगाव (आ) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. शुभांगी चंद्रकांत आवटे यांनी बाळू हरिभाऊ जाधव यांचा 24 मतांनी पराभव केला. विनोद आदिनाथ  आवटे यांना फक्त 13 मतांवर समाधान मानावे लागले.

 नागोबाचीवाडी पोटनिवडणुकीत तुळशीराम नवनाथ भोसले यांनी सतीश युवराज बारंगुळे यांचा 51 मतांनी पराभव केला. श्रीपतपिंपरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नवनाथ छबु ताकभाते यांनी लक्ष्मण चांगदेव जाधव यांचा 86 मतांनी पराभव केला. अनिल कोळी यांना 11 मते मिळाली. 9 मतदारांनी नोटा पर्याय वापरला. 

या ग्रामपंचायतीबरोबरच तालुक्यातील इतर सहा ग्रामपंचायतीच्या 9 जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र स्थानिक पातळीवर 9 जागांची पोटनिवडणूक अविरोध पार पडली होती. सर्जापूर ग्रामपंचायत निवडणुकीत धनाजी गणपत कोरके, कुसळंब ग्रामपंचायतीमध्ये अमोल श्रीरंग ननवरे, शीतल अशोक झोंबाडे, शीतल शिवाजी टिंगरे हे 3 नूतन सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
कांदलगाव येथे सविता पांडुरंग मुकटे, तांबेवाडी लमाण तांडा येथे विमलबाई गणेश राठोड, अश्‍विनी रोहिदास पवार हे अविरोध निवडून गेले. नागोबाचीवाडी पोटनिवडणुकीत फारूख नसरूद्दीन काजी, तर भोईंजे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काविराबाई बाबासाहेब उमाटे हे अविरोध निवडण्यात आले. 

सोमवारी 28 मे रोजी सकाळी 8 वाजता बार्शी येथील उपळाई रस्त्यावरील शासकीय गोदामात मतमोजणी झाली. मतमोजणी प्रक्रियेसाठी तहसीलदार ऋषिकेत शेळके, निवासी तहसीलदार एम.एम. भोई यांनी काम पाहिले.