होमपेज › Solapur › बार्शीचा महाराजा श्री प्रसन्नदाता

बार्शीचा महाराजा श्री प्रसन्नदाता

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:28PM

बुकमार्क करा
बार्शी : गणेश गोडसे 

बार्शीच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट ही संस्था यावर्षी रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. बार्शीचा महाराजा हा नावलौकिक असलेल्या प्रसन्नदाता गणपतीने प्रथमच बार्शीत सार्वजनिक गणेश जयंती विविध विधायक उपक्रमांनी साजरी करण्याचा व महाप्रसाद वाटप करण्यास सुरूवात केली. बार्शीतील हिंदू स्मशानभूमी अर्थात मोक्षधाम बार्शी नगरपरिषदेकडून चालविण्यास घेणारे बार्शीचे प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट ही संस्था राज्यात एकमेव ठरली आहे.

अध्यात्मिक व धार्मिक वारसा असलेल्या बार्शी शहरात 1992-93 मध्ये धार्मिकवृत्तीचे व सामाजिक भान जपणारे तरूण कार्यकर्ते कमलेश मेहता यांनी पुढाकार घेत शहरातील जुन्या चिंचरोड व आताच्या प्रसन्नदाता मार्ग येथे खास जयपूर (राजस्थान) वरून संपूर्ण अस्सल संगमरवरातून घडविलेली प्रसन्नदाता ही गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती आणून बार्शीत प्रसन्नदाता गणपती मंदिरात श्रींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून येथे सतत दर्शनासाठी गर्दी असते. त्यामुळे नवसाला पावणारा व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा प्रसन्नदाता गणपती अल्पावधीतच प्रसिध्द झाला. 

ट्रस्टचे प्रमुख कमलेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश येवनकर, प्रमोद भंडारी, बसवेश्‍वर गाढवे, राजकुमार मेहता, बंडू माने, कमलेश मोहनलाल मेहता (मुंबई) हे ट्रस्टचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. आज अखेर ट्रस्टचे 185 पुरूष, तर 125 महिला सदस्या आहेत. केवळ धार्मिकता न जपता ट्रस्टने लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देत तीन वर्षात सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून त्याद्वारे 67 जोडप्यांचा विवाह मोफत करून दिला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पायी तुळजापूरला जाणार्‍या भाविकभक्तांची सेवा मागील 25 वर्षांपासून नियमित सुरू आहे. ट्रस्टने सामाजिक भान जपत समाजातील होतकरू व गरजू अशा 7 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला. भजन, किर्तनादी धार्मिक कार्यक्रमांचे जयंतीनिमित्त आयोजन करून बार्शीकरांना अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच दिली. 

ह.भ.प. इंदुरीकर महाराज असोत किंवा ताजोद्दीन बाबा औरंगाबादकर यांचे किर्तनाचे मोठे कार्यक्रमही याच ट्रस्टने बार्शीत राबवले. महिला, तरूणींच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून बुध्दिबळ, गायन, डान्स, रांगोळी स्पर्धाबरोबरच महिला महोत्सवही घेतले. बार्शीत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बार्शी शहर पोलिसांना ट्रस्टने भेट दिले. 
बार्शी नगरपरिषदेची मोक्षधाम ही हिंदू स्मशानभूमी दत्तक घेऊन विकास करत सुशोभिकरण केले. सध्या मोक्षधाम एक सुंदर पर्यटनस्थळ बनले आहे. यासाठी ट्रस्टने दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून सन 2012 पासून मागील पाच वर्षांत सुमारे 2 कोटी रूपये मोक्षधामच्या विविध विकासकामांसाठी खर्चले आहेत. 

या सामाजिक उपक्रमाची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेऊन मोक्षधामसाठी जिल्हा नियोजन समितीमधून गॅस दाहिनीसाठी 30 लाख व त्यासाठी उभारण्यात येणार्‍या हॉलसाठी 32 लाख मंजूर केले. नाव्ही कट्टा, पाणपोई,  आरसीसी स्टेडीयम, बाथरूम महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छतागृह तसेच दर्शनी भागात शंकराची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. लॉन, फळझाडे लावून परिसरात बगीचा विकसीत केला आहे. भविष्यात ट्रस्टच्या माध्यमातून मोक्षधामसाठी अस्थिलॉकर सुविधा, दशक्रियाविधी हॉल, कबूतरखाना व शववाहिकेची सोय करण्यात येणार असल्याचे कमलेश मेहता यांनी सांगितले.