Mon, Apr 22, 2019 06:06होमपेज › Solapur › बार्शी सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्षतोडप्रकरणी संबंधितांना नोटिसा

बार्शी सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्षतोडप्रकरणी संबंधितांना नोटिसा

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:32PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

पुणे-लातूर राज्यमार्गावरील पांगरी ते ढेंबरेवाडी दरम्यानच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची सरकारी झाडे बेकायदेशीर पद्धतीने व विनापरवाना तोडून विक्री केल्याप्रकरणी संबंधित कर्मचार्‍यांना याबाबत बार्शी उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयाकडून लेखी नोटिसा पाठवून म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

के.एच. मुंढे (स्था. अभि.सहाय्यक) व व्ही.ए. नागटिळक (मैलमजूर) अशी याप्रकरणी नोटीस काढण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे आहेत. 

ढेंबरेवाडी ते पांगरी दरम्यानच्या वृक्षतोड प्रकरणातील दोषींसह सदर चोरीचे लाकूड घेणार्‍या येडशी येथील  संबंधित व्यापार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी, असे लेखी निवेदन बार्शी येथील आप्पासाहेब पवार यांनी उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात दिले होते. निवेदनाची दखल न घेतल्यास बार्शी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही पवार यांनी दिला होता. 

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला असलेली जवळपास चार ते पाच सरकारी मोठी झाडे त्या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी संगनमताने तोडून ती झाडे येडशी (ता.जि. उस्मानाबाद) येथील व्यापार्‍यास चोरुन विकून टाकली. विशेष म्हणजे हे की, सदर तोडण्यात आलेली रस्त्यालगतची शासकीय झाडे तोडण्यासाठी तहसीलदार अथवा वनविभागाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. याबाबत दै.पुढारीने शनिवारी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.पवार यांच्या तक्रारीची दखल घेऊन बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधितास नोटीस काढून सदर तक्रारीबाबत लेखी खुलासा देण्यास सांगितले आहे.