Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Solapur › बँकांनी साखर कारखान्यांना कर्ज नाकारले; एफआरपी देणार कशी?

बँकांनी साखर कारखान्यांना कर्ज नाकारले; एफआरपी देणार कशी?

Published On: Sep 11 2018 11:02PM | Last Updated: Sep 11 2018 9:47PM
 सोलापूर ः प्रतिनिधी
राज्यातील साखर कारखान्यांकडे थकीत असलेल्या एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना मिळावी यासाठी वारंवार मागणी होत असतानाही शेतकर्‍यांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी कारखानदार कर्ज मिळविण्यासाठी बँकांच्या दारोदार फिरत असले तरी बँका त्यांना कर्ज देण्यास तयार नसल्याने यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीच पुढाकार घेतला असून राज्य शिखर बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन त्यांनी कारखानदारांना दिले आहे. 
5 सप्टेंबरपर्यंत थकीत एफआरपी देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र यावर कारखानदारांना अनेक बँकांनी कर्जे नाकारली आहेत. त्यामुळे ही एफआरपी कारखाने देणार कशी व कधी, असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. ज्या साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी रकमा थकीत आहेत त्या कारखान्यांना राज्य शिखर बँकेकडून कर्ज स्वरुपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. तशाप्रकारच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत. राज्यातील 41 साखर कारखान्यांकडे जवळपास 437 कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. यामध्ये सर्वाधिक कारखानदार हे सोलापूर जिल्ह्यातले असून जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांकडे 129 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यावरुन शेतकरी संघटनांसह काही राजकीय पक्षांनीही एफआरपी तात्काळ द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांनी 5 सप्टेंबरपर्यंत थकीत एफआरपी देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कारखानदारांना अनेक बँकांनी कर्जे नाकारली. त्यामुळे कारखानदार एफआरपी देण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे सहकार विभागाने पुन्हा साखर कारखानदारांना 15 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांची बिले देण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही कारखानदार हतबल असल्याने त्यांना आता थेट राज्य शिखर बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देण्याचे धोरण सहकारमंत्र्यांनी ठरविले आहे. राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखानदारांना उपलब्ध साखरेवर कर्ज स्वरुपात ही रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी तशाप्रकारची मागणी राज्य शिखर बँकेकडे करावी, अशा सूचनाही सहकारमंत्र्यांनी केल्या आहेत.