Sun, May 26, 2019 10:55होमपेज › Solapur › बँकांकडून ‘मुद्रा’च्या फाईलींचा निपटारा संथ गतीने 

बँकांकडून ‘मुद्रा’च्या फाईलींचा निपटारा संथ गतीने 

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 8:41PMसोलापूर ः प्रतिनिधी

मुद्रांच्या फाईलींचा निपटारा धिम्या गतीने होत असून जून  2018 पर्यंतच्या मिळालेल्या आकडेवाडीनुसार मुद्रा कर्ज देणार्‍या बँकांच्या यादीत सोलापूर जिल्हा  तिसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. 15 जूनपर्यंतच्या मिळालेल्या आकडेवाडीनुसार 143.20 कोटी मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर झाले आहे.

मेच्या  शेवटच्या आठवड्यामध्ये बँक अधिकार्‍यांच्या बदली प्रक्रियेमुळे केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या फाईली रखडल्या होत्या. मार्च 2018 च्या आकडेवाडीनुसार सोलापूर शहरासह जिल्ह्यात 200 टक्क्यांचा टप्पा पार पडलेली मुद्रा योजना आता मात्र शुन्यावर येऊन पोहोचली  होती. हळूहळू बँक अधिकारी बदली शाखेत रुजू होत आहेत. नवीन आलेले अधिकारी कर्ज प्रकरणांची फाईली हाताळण्यास विलंब करत असल्याने अनेक कर्ज प्रलंबित आहेत. केंद्र शासनाची मुद्रा तर जवळपास गोगलगायीच्या गतीने पुढे सरकत आहे.

सोलापूर शहरासह जिल्हाभरातील बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयडीबीआय बँक, देना बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, कॉर्पोरेशन बँक सह आदी बँकातील अधिकारी कर्जवाटप, कर्ज माफ, वसुली आदी कामात व्यस्त असल्याने मुद्रा योजना मात्र रखडली आहे. आता मुद्राचे अर्जदेखील  मिळण्यास अवघड झाले आहेत. कोणत्याही एका सरकारी बँकेत गेले असता मुद्रा कर्जप्रकरणाचे अर्ज मागितल्यास बँक मॅनेजर किंवा लोन अधिकारी काहीना काही कारणे देऊन त्या ग्राहकाला परत पाठवित आहेत. ग्राहकांना हेलपाटे मारण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नाही व तसेच अधिकारी एरियाची कारणे देऊन ग्राहकाला परत पाठवित आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व तत्कालिन लीड मॅनेजर सुरेश श्रीराम यांनी सोलापुरात अनेक सेमिनार व व्याख्याने देत जनजागृती केली होती, मुद्राचे कर्ज घेण्यासाठी एरियाचे बंधन नाही. ज्या सरकारी बँकेत खाते(बचत खाते, चालू खाते) आहे त्या बँकेत जाऊन मुद्रा योजनेचा अर्ज करु शकता व लाभ घेऊ शकता. परंतु सध्या चित्र बदलत असून पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता बँक अधिकारी ग्राहकांना तुमचा एरिया आमच्या शाखेच्या अंतर्गत येत नाही अशी माहिती देत दिशाभूल करण्याचा  प्रयत्न करु लागले आहेत.

मुद्रा योजनेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळू शकते. ज्यांना नवा उद्योग, किंवा काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल, अशी तरतूद करण्यात  आली आहे. परंतु अनेक राष्ट्रीय बँका मुद्रा कर्ज मागण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात किंवा हेलपाटे मारण्यास भाग पाडतात. 

बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयडीबीआय बँक, देना बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, कॉर्पोरेशन बँक, सिंडीकेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी  बँकांतील रखडलेल्या मुद्रा प्रकरणांची माहिती विचारली असता ती देण्यास  अधिकारी टाळाटाळ करतात. या बँक अधिकार्‍यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बँक अधिकार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक

बँकांतील अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात आहे. सोलापुरात एका सरकारी बँकेत उद्योजकाने मुद्रा योजनेतून अर्ज केला असता बँक मॅनेजरने अपमानास्पद वागणूक दिली व शिपायामार्फत बँकेच्या बाहेर काढले.अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात 4 जून रोजी तक्रारी अर्ज  केला. मात्र   अद्यापपर्यंत लोन मिळाले नाही व कोणतीही कारवाई झाली नाही.

मुद्रा कर्ज वाटपात सोलापूर आले तिसर्‍या क्रमांकावर

केंद्र शासनाच्या मुद्रा कर्ज वाटपात सोलापूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.15 जून पर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 43 हजार 646 खातेधारकांसाठी 160.85 कोटींची मंजुरी मिळाली. त्यामधून 143.20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात मुद्रा कर्ज वाटपात प्रथमस्थानी पुणे, द्वितीयस्थानी नागपूर, तर तृतीयस्थानी सोलापूर आहे.