Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Solapur › पंढरपुरात नाण्यांची विश्वासार्हता धोक्यात

पंढरपुरात नाण्यांची विश्वासार्हता धोक्यात

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 11:22PMपंढरपूर : प्रतिनिधी

दहा रुपये आणि 5 रुपयांसह सर्व प्रकारची नाणी स्वीकारली जावीत अशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना असताना पंढरपूर शहरातील सर्वच बँका नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. एकप्रकारे हा भारतीय चलनाचा अनादर असूनही बँक व्यवस्थापनाकडून सरळपणे चलनाचा अनादर करून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे व्यापारीवर्गासह सामान्य ग्राहकांतूनही नाण्याच्या विश्‍वासार्हता आणि स्वीकारार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

सध्या भारतीय चलनात 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयांची नाणी आहेत. ही नाणी देशात सर्वत्र स्वीकारली जावीत, अशा सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात दिलेल्या आहेत. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणे हा चलनाचा अनादर ठरतो आहे. मात्र तरीही पंढरपूर शहरातील सर्वच बँका 10 रूपयांसह खालची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. ही नाणी नाकारताना त्यांची मोजदाद वेळखाऊ आहे, साठवणूक आणि वाहतूक करणे जीकिरीचे असल्याची कारणे सांगत स्पष्टपणे नाणी नाकारली जात आहेत. या नाण्यासाठी दररोज बँकांमध्ये व्यापारी, ग्राहकांमध्ये वादावादी सुरू असते.

बँकाच नाणी नाकारत आहेत हे लक्षात आल्यानंतर बाजारातही या नाण्यांची विश्‍वासार्हता धोक्यात आलेली आहे. 10 रुपयांची अधिक संख्येने नाणी स्वीकारण्यास कुणीही तयार होत नाही असे दिसते. अगदी किरकोळ बाजारातही 10 रूपयांचे नाणे असेल तर परत करून नोट मागितली जाते आणि त्यावरून पुन्हा ग्राहक आणि किरकोळ व्यापारी यांच्यामध्येही वाद निर्माण होत आहे. 

पंढरपूर शहरात येणार्‍या भाविकांची संख्या दररोज सरासरी 40 हजारांची आहे. त्यातील बहुतांश भाविकांची खरेदी-विक्री ही 10 रूपयांच्या प्रमाणातच असते. अगदी पेढे, उदबत्ती, बत्तासे, चुरमुरे, कुंकू, बुक्‍का आदी प्रासादिक वस्तू 10, 20 रुपयांच्या मूल्यात विकल्या जातात.  वारकर्‍यांकडून बहुतांश प्रमाणात नाण्यांचा वापर केला जात आहे. यामुळे पंढरपूर शहरातील किरकोळ व्यापार्‍यांना 10 रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात स्वीकारावी लागत आहेत आणि ही नाणी पुन्हा सर्वच्या सर्व बाजारात जात नसल्याने ती बँकेत जमा करावी लागत आहेत. अशावेळी बँका ही नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्यामुळे किरकोळ व्यापार्‍यांची मोठीच गैरसोय होत आहे. 

हल्ली 2 हजार, 500, 200, 100, 50,20 आणि 10 रुपयांच्या नोटा बाजारात चलनी असल्या तरी लहान स्वरूपाच्या व्यवहारात आणि सुटे देण्या-घेण्यासाठी 10 रुपये, 5 रुपये आणि 1 व 2 रुपयांची नाणी वापरणे अवश्यक आहे. मात्र हीच नाणी बँकांकडून नाकारली जात असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकही नाणी स्वीकारताना तक्रारी करीत आहे. यामुळेच नाण्यांच्या स्वरूपात असलेल्या अधिकृत भारतीय चलनाचा अनादर होऊन त्या  चलनाची विश्‍वासार्हताही खालवत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची पायमल्ली करणार्‍या सर्व बँकांवर योग्य ती कारवाई केली जावी आणि सर्व नाणी स्वीकारण्यास त्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी सामान्य ग्राहक आणि व्यापारीवर्गातून होत आहे. दरम्यान, बँकांच्या या धोरणामुळे नागरिकांना आणि व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत निंदाजनक आहे.