Fri, Mar 22, 2019 08:38होमपेज › Solapur › उजनीतून विसर्ग वाढला

उजनीतून विसर्ग वाढला

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:42PMबेंबळे : वार्ताहर

दौंड येथून उजनी धरणात येणार्‍या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. सध्या उजनीची एकूण पाणीपातळी 497.190 मीटर असून एकूण पाणीसाठा 3442.57 द.ल.घ.मी. एवढा आहे.

सध्या उजनी धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. उजनी धरणातून भीमा नदीत बंद केलेला विसर्ग पुन्हा चालू केला असून तो नदीत 5000 क्युसेक, तर वीजनिर्मितीसाठी 1600 असा  6600 क्युसेकने सोडला जात आहे. दौंड येथून येणार्‍या विसर्गात पुन्हा वाढ झाली असून, 3317 वरून विसर्ग 18 हजार क्युसेक झाला होता. त्यात पुन्हा बुधवारी घट होऊन 9704 क्युसेक झाला आहे. त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. परंतु, दौंड येथून येणार्‍या विसर्गात गेल्या आठ दिवसांत घट झाली होती. पुन्हा काल बंडगार्डन येथून विसर्ग वाढल्यामुळे त्याचा परिणाम दौंड येथील विसर्गात वाढ होण्यात झाला होता.

सध्या उजनी धरणाची पाणीपातळी अशी आहे ः एकूण पाणीपातळी ः 497.190 मीटर, एकूण पाणीसाठा ः 3442.57 द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ः 1639.76 असा आहे. पाण्याची टक्केवारी 108.08 टक्के आहे. उजनीत दौंड येथून येणारा विसर्ग 9704 क्युसेक, बंडगार्डन येथून येणारा विसर्ग 7207 क्युसेक आहे. उजनीतून  सोडण्यात येणारे पाणी ः भीमा नदी  ः 5000 क्युसेक, 
उजनी कालवा ः 3200 क्युसेक, वीजनिर्मितीसाठी ः 1600, बोगद्यातून 9000 क्युसेक. सध्या उजनी धरणातून नदी, कालवा, बोगदा, वीजनिर्मिती याद्वारे 10 हजार 700 क्युसेक पाणी सोडले जात आहे. उजनीत दौंड येथून 9704 क्युसेकचा विसर्ग येत आहे. त्यामुळे सध्या उजनी धरणातून 996 क्युसेक  पाणी कमी होत आहे. त्यामुळे पाणीसाठा थोडाथोडा कमी होण्याची  शक्यता  आहे . त्यामुळे भीमा नदीतला सोडलेला विसर्ग कमी-जास्त करावा लागणार आहे.