Wed, Apr 24, 2019 22:23होमपेज › Solapur › ४८ तासांत उजनीत दहा टक्के वाढ

४८ तासांत उजनीत दहा टक्के वाढ

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:02PM
बेंबळे : वार्ताहर
 उजनी व त्यावरील एकोणीस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात येणार्‍या पाण्यामध्ये वाढ होत असून मागील 48 तासांमध्ये उजनी धरणातील पाणीसाठ्यात 10 टक्के वाढ झाली आहे.
सध्या उजनी धरणात  दौंड येथून 14 हजार 115 क्युसेकचा विसर्ग मिसळत असल्याने उद्यापर्यंत उजनी धरणाची टक्केवारी 45 टक्क्यांच्याही  पुढे जाण्याची शक्यता आहे.
    सध्या उजनी धरणाची पाणीपातळी
एकूण पाणीपातळी 493.935 मी., एकूण पाणीसाठा 2460.84 द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा 658.03, टकेवारी 43.37 टक्के, कालवा 3250 क्युसेक, बोगदा 900, सीना माढा 200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

 गेल्या दोन दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनीसह सर्वच धरणांची पाणीपातळी वाढत आहे. वरील धरणांपैकी 8 धरणांतून सध्या  28 हजार 353 क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे.
कालच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे काही धरणांतून सोडलेले पाणी कमी करण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणात येणारा विसर्ग कमी झाला आहे.
 दौंडचा विसर्ग  28 हजार 904 क्युसेक होता तो गुरूवारी  घटून 14 हजार 115 क्युसेकवर आला आहे.
सध्या उजनी वरील 9 धरणांतून खालीलप्रमाणे पाणी सोडले आहे.
चासकमान 5 हजार 448, वडिवले 688, कळमोडी 918, पानशेत 3 हजार 908, आंध्र 335, पवना 2 हजार 208, मुळशी 8 हजार, खडकवासला  6 हजार 848 असे एकूण 28 हजार 353 क्युसेक पाणी उजनीच्या दिशेने येत आहे.
उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा होऊ लागल्यामुळे सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकरी, कारखानदार, नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.