होमपेज › Solapur › ‘उजनी’ १०७ टीएमसी

‘उजनी’ १०७ टीएमसी

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:33PMबेंबळे : प्रतिनिधी

सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाने 100 टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा पार केला असून उजनी धरणात सध्या 107 टीएमसी पाणीसाठा झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उजनीवरील सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे 9 धरणे तुडुंब भरली आहेत. या सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गत 32 दिवसांत उजनी धरण 84 टक्के भरले आहे.  येत्या दोन दिवसांत उजनी धरण  100 टक्के भरण्याची शक्यता आहेे. 

उजनी धरणावरील 19 धरणांपैकी 15 धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने त्या धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे. पावसाळा चालू झाल्यापासून धरणात 104 टक्के पाणी आले आहे. मायनस 20 टक्के आणि प्लस 84  टक्के असा 104 टक्के पाणीसाठा झाला आहे.

उजनी धरणातील पाणीसाठ्याने गुरूवारी दुपारी 100 टीएमसीचा टप्पा ओलांडला. सध्या उजनीत एकूण 107.73 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यात 44.07 टीएमसी पाणी उपयुक्त पाणीसाठी म्हणून गणले जाते. आता केवळ धरण 100 टक्के होण्यास केवळ 9 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

उजनीत दौंड येथून मागील सात ते आठ दिवस येणार्‍या विसर्गात सातत्य राहिल्यामुळे उजनी धरण गुरुवारी सायंकाळपर्यंत 84 टक्केच्या पुढे सरकले. सध्या दौंड येथून 50 हजार 638 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आणखी दोन दिवस राहिल्यास उजनीची पाणी पातळी 100 टक्के होऊ शकतो. धरणाचा पाणीसाठा सायंकाळी पाच वाजता 84 टक्क्यांवर पोहोचला होता. यावर्षी उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी वजा 19.82 टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. त्यात समाधानाची बाब अशी की, प्रथमच उजनीचा पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्लस मध्येच राहिला. दरवर्षी उजनी धरण एक मेच्या आतच मायनसमध्ये आलेले असते. यावेळी 24 मेमध्ये मायनसमध्ये गेले. तर 21 जुलैला प्लसमध्ये आले होते.

भीमा नदीला पूर येण्याची शक्यता

उजनी धरण दोन दिवसांत 100 टक्के भरणार असल्याने पुढील आठवड्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे लागणार आहे. उजनीवरील 19 धरणे गेल्या आठ- दहा दिवसांपासून ओव्हर फ्लो झाली आहेत. आता परतीचा पाऊसही चालू होणार असल्याचा हवामान खात्याचा कयास आहे आणि सोलापूर जिल्ह्यात परतीचाच पाऊस चांगल्या प्रकारे पडतो, हा इतिहास आहे. वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग सोडला जात आहे. तो पुढे नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  उजनीतून भीमेत विसर्ग झाल्यास भीमेला पूर येऊ शकतो. त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

सध्या बंडगार्डन येथून 34  हजार 300 क्युसेक, तर दौंड येथून 50 हजार 638 क्युसेकने उजनीत विसर्ग सुरू आहे. तर उजनीतून कालव्याद्वारे 2 हजार तर बोगदा 900 व सीना-माढा 240 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.