Fri, Mar 22, 2019 01:31
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › मायनसपातळीही घटली, उजनीच्या पोटातील वास्तू उघड्यावर

मायनसपातळीही घटली, उजनीच्या पोटातील वास्तू उघड्यावर

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:32PMबेंबळे : वार्ताहर

उजनी धरणातून सध्या कालव्याद्वारे 3350, तर भीमा नदीतून 8000 क्युसेकने विसर्ग चालू असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या वास्तूंचे एक-एक अवशेष दृष्टीस पडत आहेत. 

धरणामुळे विस्थापित झालेले ग्रामस्थ आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धरणावर गर्दी करू लागले आहेत. ग्रामस्थांसह इतिहास, भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी, हौशी पर्यटक आणि पक्षीनिरीक्षकांची उजनीकडे रीघ लागली आहे.

उजनी धरणाच्या बांधकामावेळी तालुक्यातील पूर्वीच्या 29 गावांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यावेळी या गावातील नागरिकांनी शक्य असेल ते साहित्य आपल्या पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेत नेले होते. त्यावेळी प्रामुख्याने घरांचा मूळ साचा जागेवरच राहिला होता. शिवाय गावातील सार्वजनिक इमारती तशाच पडून होत्या. मंदिरांमधील मूर्ती नव्या जागेत गेल्या मात्र, मंदिरांचा ढाचा तसाच जागेवर होता.
आता पाणी कमी झाल्यानंतर घरे, मंदिरे जैसे थे अवस्थेत पुन्हा दिसू लागली आहेत. वांगी परिसरातील पाण्यात बुडालेल्या श्री शारदाभवानी मातेच्या पुरातन मंदिराचे दर्शन होऊ लागले आहे. कुगाव परिसरातील जुने वाडे पाण्याबाहेर दिसू लागले आहेत. तसेच  पोमलवाडी परिसरात जुन्या ब्रिटिश रेल्वेपुलाचा वरील भाग नजरेस पडू लागला आहे. याशिवाय पाण्याखाली गेलेली लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ देवाची मंदिरेही पाण्याबाहेर डोकावू लागली आहेत. इंदापूर (जि. पुणे) येथील पळसदेवचे श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिरही पाण्याबाहेर पडले आहे.

ही स्थळे पाण्याखाली बुडून साधारणत: चार दशके उलटून गेली आहेत. तरीही वाडे व मंदिरांचे बहुतेक अवशेष अद्यापही मजबूत अवस्थेत आहेत. या वास्तूंच्या बांधणीचा अभ्यास करण्यासाठी इतिहास, भूगोल विषयाचे अभ्यासकही गर्दी करू लागले आहेत. पाणथळ भागात पक्षी गर्दी करीत असल्याने पक्षी निरीक्षकही मोठ्या संख्येने उजनीला भेट देत आहेत.

उजनी धरणाची पाणीपातळी वजा 10 % च्या पुढे गेल्यानंतर इंग्रजकालीन रेल्वे पूल उघडा पडण्यास सुरुवात होते. तर उजनी वजा 17 ते 20 पर्यंत गेल्यानंतर वांगीजवळ असणारा पाण्याखालचा इनामदारवाडा उघडा पडण्यास सुरुवात होते.

सध्या उजनी धरणातून 8 मे पासून कालव्याद्वारे 3350 क्युसेसने विसर्ग चालू आहे. बोगद्यातून 220 क्युसेसने, तर आजपासून भीमा नदीतून 8000 क्युसेसने विसर्ग चालू झाला आहे.आतापर्यंत 2012 मध्ये उजनी सगळ्यात जास्त मायनस (-53.56%) मध्ये गेले होते. त्यावेळी उजनीच्या पोटात गायब झालेल्या वास्तू सर्व वर आल्या होत्या. आता सध्या उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने खाली चालली आहे. त्यामुळे उजनीच्या पोटातील गायब झालेल्या सर्व गोष्टी वर येऊ लागल्या आहेत. उजनी धरणातील अनेक वास्तू लोकांना दिसण्यास सुरुवात झाली आहे.