Mon, Apr 22, 2019 12:16होमपेज › Solapur › वाईन शॉपवर मद्यांच्या जाहिरातीस बंदी

वाईन शॉपवर मद्यांच्या जाहिरातीस बंदी

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 9:06PM परमिट रुमधारकांना हा नियम लागू नसल्याने नाराजीचा सूर
 

सोलापूर : अमोल व्यवहारे

राज्यातील वाईन शॉपवर विविध मद्यांच्या ब्रँडच्या जाहिरातींचे फलक लावण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  आयुक्‍त  डॉ. अश्‍विनी  जोशी    यांनी  बंदी  केली असून याबाबतचा   आदेश  नुकताच राज्यातील विविध  राज्य  उत्पादन   शुल्क विभागांना पाठविण्यात आला आहे. परंतु वाईन   शॉपला  लागू  केलेला हा नियम परमिट रूमधारकांना लागू न  केल्याने वाईन शॉपचालकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

राज्यातील बहुतांशी वाईन शॉप (एफएल 2) धारकांना दिलेल्या परवान्यातील शर्त क्र. 5 चा भंग करीत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. वाईन शॉपच्या प्रवेशद्वारावर 60 बाय 90 सें.मी.च्या नावाचा फलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर परवानाधारकाचे नाव, परवाना नंबर व पत्ता, वाईन  शॉप सुरु व बंद होण्याची वेळ इतकाच मजकूर लावण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार अट क्र. 5 नुसार यापेक्षा अधिक कोणताही मजकूर या फलकावर लावू नये, असे सांगण्यात आलेले आहे. 

परंतु राज्यातील बहुतांशी वाईन शॉप (एफएल 2) दुकानांवर विविध मद्यांच्या ब्रँडचे जाहिरातवजा फलक, ग्लोईंग साईन बोर्डस, फ्लेक्स, नीऑन साईन्स इत्यादी वाईन शॉपच्या दर्शनी भागाच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्याचे दिसून आले आहे. यामुळे वाईन शॉपचालकांकडून त्यांना दिलेल्या परवान्यांमधील अटी व शर्तींचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्‍त कार्यालयास मिळाल्यानंतर ही बाब विचारात घेऊन येत्या 15 दिवसांत वाईन शॉपवरील अतिरिक्‍त जाहिरातवजा फलक दुकानांवरून काढून टाकण्याचे आदेश आयुक्‍त डॉ. जोशी यांनी दिलेले आहेत. 

प्रत्येक  जिल्ह्यातील  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी त्यांच्याकडील  वाईन शॉपवर लावण्यात आलेल्या मद्यांच्या जाहिरात करणारे  फलक व इतर कोणताही मजकूर असणारे  दर्शनी  भागातील फलक त्वरित काढून  टाकावेत, असे आदेश डॉ. जोशी यांनी दिले आहेत.  मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत देण्यात येणार्‍या इतर परवानाधारकांवरसुध्दा याप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश दिले  आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत देण्यात येणारी देशी दारू दुकाने (सीएल 3) या दुकानांकडूनही नामफलक नियमावली पाळली जाते की नाही याची तपासणी करण्याचे आदेशसुध्दा आयुक्‍त डॉ. जोशी यांनी दिले आहे. त्यामुळे आता वाईन शॉप आणि देशी दारू दुकानांवर लावलेल्या मद्यांच्या बॅ्रँडच्या जाहिरातींचे फलक काढण्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात येणार असल्याचे समजते.