होमपेज › Solapur › भाजप व सहकारमंत्र्यांना मोहोळ तालुक्याची नाळ कळलीच नाही

भाजप व सहकारमंत्र्यांना मोहोळ तालुक्याची नाळ कळलीच नाही

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:06PMमोहोळ ः प्रतिनिधी 

मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ते आणि जनता ही लोकनेते अण्णा व माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून स्वाभिमानाने काम करतात. भाजपच्या मंत्र्यांना मोहोळ तालुक्याची नाळ आणि नस कळली नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली आणि त्यांचा विधानसभेला पराभव झाला. जि.प. आणि प. समितीमध्ये तर भाजपला आपल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही, अशी बोचरी टीका लोकनेते शुगरचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव न घेता केली. घाटणे येथील कार्यक्रमात सहकारमंत्री देशमुख यांनी मोहोळ तालुका गुलामगिरीतून मुक्त करा, अशी टीका काल केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बाळराजे पाटील यांनी आज हे वक्तव्य करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.                        

अंकोली (ता. मोहोळ) येथे स्वयंम शिक्षण प्रयोग पुणे यांनी तोयम टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीच्या विद्यमाने बजाज ऑटो प्रा. लि. पुणे यांच्या सामाजिक विकास फंडातून तासी 1 हजार लिटर पाणी शुद्धीकरण करणारा  प्रकल्प ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार  राबविला आहे. त्याचे उद्घाटन (दि. 1) बाळराजे पाटील यांच्या हस्ते  फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर हे होते . 

यावेळी जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे, पं.स. सदस्य ज्ञानेश्‍वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा बँकेचे संचालक भारतभाऊ सुतकर, लोकनेतेचे संचालक अशोक चव्हाण, अशोक क्षीरसागर, शिवाजी चव्हाण, शिवराज पाटील,  बाबासाहेब पवार,  काकासाहेब पाटील, तुळशीदास पवार, अंबादास भोसले, विकास पवार, लोकनेते शुगरचे वित्त अधिकारी  तथा माजी सरपंच गोरखनाथ पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.           

प्रारंभी बाळराजे पाटील यांच्या हस्ते जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद् घाटन करण्यात आले. त्यानंतर हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अंकोली ग्रामपंचायतीचे सरपंच तथा लोकनेते शुगरचे संचालक संदीपकाका पवार व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी वर्षभरात केलेल्या विविध योजना व विकासकामे उत्कृष्टपणे राबवून विकासाचा बॅकलॉग भरून काढला असल्याचे सांगत अंकोली ते औंढी हा आम्ही मंजूर केलेला रस्ता आणि 25 लाख रुपये निधी जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यानी व  तालुक्यातील विरोधकांनी बदलून स्वत:च्या मतदारसंघात पळवला असा आरोप करत बाळराजे पाटील यांनी हा रस्ता करण्यासाठी आम्ही तुम्हाला शब्द दिला आहे, तो लवकरच मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, बाबा पवार, उमेद अभियानचे काकासाहेब अडसुळे, तानाजी पवार आदींची भाषणे झाली.