महूद : वार्ताहर
आकाशातून अचानक एका बॉक्ससह बलून सॅटेलाईट जमिनीवर कोसळल्याने सर्वांची धावपळ उडाली. हे यान तर नसावे ना, या भीतीने धास्तावलेल्या शेतकर्यांना तो मानवनिर्मित बलून असल्याची खात्री होताच सुटकेचा नि:श्वास घेतला. हा प्रकार बुधवारी दु.3.30 च्या सुमारास महीमअंतर्गत चौगुले वस्ती (ता.सांगोला) येथे अनुभवास आला.
महीम येथील औदुंबर भुसनर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दु.3.30 च्या सुमारास आकाशातून झेपावत बलून खाली कोसळला. यावेळी ऊस तोडणी मजुरांनी घाबरलेल्या अवस्थेत खाली काय कोसळले, हे पाहण्यासाठी बलूनकडे धाव घेतली. यावेळी रामेश्वर चौगुले यांनी घाबरतच त्या बलूनच्या बॉक्सवर काय लिहिलेले आहे, हे वाचले. त्या बॉक्सवर हा राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा उपक्रम असून कृपया बॉक्स ओपन करू नये, असे लिहिलेले होते. हा बलून ज्या ठिकाणी मिळून येईल, तेथील संबंधितांनी या बलूनचा बॉक्स नजीकच्या पोलिस स्टेशनला जमा करावा, अगर आमच्याशी संपर्क साधावा, असे नमूद केले होते. बॉक्सवर अशाप्रकारे नमूद केल्यामुळे रामेश्वर चौगुले यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून याविषयी पोलिसांना कळवावे, असे सांगितले होते. अखेर राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची टीम बलूनच्या शोधात होती. बलून कोसळल्याची खबर मिळताच हवालदार सुरेश पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. राजाराम बापू महाविद्यालयाची टीम सॅटेलाईटच्या मदतीने या ठिकाणी पोहोचली होती. यावेळी टीमने हा बलून बॉक्स ताब्यात घेऊन इस्लामपूरकडे रवाना झाले.
याबाबत, टीमशी संपर्क साधला असता, आम्ही स्थानिक जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने हा मानवनिर्मित उपग्रह बलूनच्या सहाय्याने आकाशात सोडला होता. त्याची क्षमता 5 कि.मी.ची होती. परंतु, बलूनसोबत एक हवेचा फुगा असल्याने तो दूरवर जाऊन फुटल्यामुळे बलून कोसळला आहे. हा मानवनिर्मित उपक्रम असून या बॉक्समध्ये हवेचा नमुना असून त्याच्या सोबत एक फुगा बांधला होता. त्याची मर्यादा 31 कि.मी.पर्यंत होती. परंतु, त्याचा संपर्क तुटल्याने तो सॅटेलाईटद्वारे सोलापूर जिल्ह्यात कोठेतरी कोसळतोय, हे समजले होते. त्यानुसार या ठिकाणी जाऊन तो बलून बॉक्ससह ताब्यात घेतल्याचे टीमचे प्रमुख प्रा. महेश पिसाळ यांनी सांगितले.