सोलापूर : प्रतिनिधी
अर्जुनी मोरगाव (अकोला) येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन झाले. यावेळी पंढरपूर येथील गुरुजीबुवा फडाचे प्रमुख ह.भ.प. बाबा महाराज राशिनकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष ना. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन जीवनगौरव वारकरी विशेष कार्य पुरस्कार देण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्रातील मृदंगाचार्य व अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर शहर अध्यक्ष ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ह.भ.प. बाबा महाराज राशिनकर यांनी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक राज्यातही वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आहे. तसेच आषाढी वारीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये 1981 पासून आजतागायत लोणंद येथे कीर्तन सेवा असते. वारकरी सांप्रदायमध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी संमेलन अध्यक्ष श्री संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लवितकर महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर (अध्यक्ष समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटना, पंढरपूर), वारकरी साहित्य परिषदेचे ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, पैठणचे एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प. योगीराज गोसावी महाराज व महाराज मंडळी उपस्थित होती.