Wed, Jun 26, 2019 23:29होमपेज › Solapur › स्थायी सभापतीवरुन भाजपात ‘शिमगा’

स्थायी सभापतीवरुन भाजपात ‘शिमगा’

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:52PMसोलापूर : प्रतिनिधी 

होळीच्या दिवशी महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदावरून गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या दोन गटांत राजकीय शिमगा पहावयास मिळाला. उमेदवारीबाबत एकमत न झाल्याने दोन गटांचे स्वतंत्र अर्ज दाखल करण्याचे मनसुबे शिवसेनेच्या विरोधामुळे उधळले गेले. अर्जांची पळवापळवी, झटापट आदी नाट्यपूर्ण घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीबाबत काय होणार, याची प्रचंड उत्सुकता लागली.

स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी सकाळी 11 ते 2 यावेळेत अर्ज सादर करण्याची मुदत होती. 11 वाजण्यापूर्वीच महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, स्थायी समितीचे मावळते सभापती संजय कोळी यांच्यासह भाजपचे काही नगरसेवक मनपात ठाण मांडून होते. पालकमंत्री तसेच सहकारमंत्री गटाचे नगरसेवक या पदासाठी इच्छुक होते. यावरून एकमत न झाल्याने गटबाजीचा नेहमीप्रमाणे प्रत्यय येणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली. स्थायीमधील भाजपच्या आठ सदस्यांपैकी राजश्री कणके, विनायक विटकर हे पालकमंत्री गटाचे सदस्य वेळेवर उपस्थित होते. मात्र, नागेश वल्याळ, श्रीनिवास रिकमल्ले, सुभाष शेजवाल, श्रीनिवास करली, मनीषा हुच्चे, जुगनबाई अंबेवाले, राजश्री बिराजदार हे सहकारमंत्री गटाचे सहा सदस्य अनुपस्थित होते. यातील अनेकांनी आपले मोबाईलही बंंद ठेवले होते. 

दरम्यान, पावणेबाराच्या सुमारास शिवसेनेतर्फे गणेश वानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यानंतर काही वेळातच भाजपचे शहराध्यक्ष निंबर्गी यांनी सभागृह नेतेपदासाठी संजय कोळी, तर स्थायी सभापतिपदासाठी प्रदेश भाजपने राजश्री कणके यांच्या नावाची शिफारस केल्याचे जाहीर केले.  यानंतर महापौर बनशेट्टी, शहराध्यक्ष निंबर्गी, स्थायी सभापती कोळी यांनी कणके यांच्यासह नगरसचिव कार्यालयात जाऊन अर्ज नेेले.

दरम्यान, हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सादर करण्यासाठी अनुमोदकाची गरज निर्माण झाली. शहराध्यक्ष निंबर्गी यांनी वल्याळ तसेच अन्य नगरसेवकांशी संपर्क साधून ताबडतोब मनपात येण्यासाठी विनवणी केली. मात्र, सभागृहनेता किंवा स्थायी सभापती यापैकी एक पद आपल्याला मिळावे, अशी मागणी करीत सहकारमंत्री गटाने आपल्या ‘असहकारा’चा पवित्रा कायम ठेवला. यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष शेजवाल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सहकारमंत्री गट मनपात दाखल झाला. हा गट नगरसचिव कार्यालयात आल्यावर संजय कोळीसह अनेकांनी अर्ज भरु नका, अशी विनंती केली. मात्र सहकारमंत्री ऐकायला तयार नव्हता.

यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक चकमक होत असतानाच प्रचंड गोंधळात एका कार्यकर्त्याने शेजवाल यांचा अर्ज हिसकावून पोबारा केला. यामुळे शेजवाल यांना अर्ज दाखल करता आला नाही. यामुळे नाराज झालेल्या सहकारमंत्री गटाने मनपातून काढतापाय घेतला. या गटाचे सर्वजण शेजवाल यांच्या घरी गेले. यानंतर त्यांचा शोध घेत काही मिनिटांतच निंबर्गी तिथे पोहोचले. निंबर्गी यांनी वल्याळ यांची मनधरणी करुन बंडखोरी करण्यापासून परावृत्त केले. यानंतर हे सर्वजण दोन वाजण्यास तीन मिनिटे कमी असताना नगरसचिव कार्यालयात आले. दरम्यान, पक्षाचे अधिकृत उमेदवार राजश्री कणके यांच्या उमेदवारीच्या दोन अर्जांपैकी एका अर्जावर वल्याळ यांनी अनुमोदक म्हणून सही केली, तर दुसर्‍या अर्जावर करावयाची होती.

मात्र एवढ्यात तिथे उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्याची वेळ संपली असल्याचे सांगत कणके यांना अर्ज दाखल करण्यास मज्जाव केला. यावरुन प्रचंड गोंधळ झाला. याच गोंधळात भाजपचा एक अर्ज पळविण्यात आला. यामुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. उर्वरित एक अर्धवट भरलेला अर्ज भाजपकडून नगरसचिवांना देण्यात आला. त्यावर अनुमोदकाची सही नसल्याचे समजते. 

हा गोंधळ पाहून महापौर बनशेट्टी, उमेदवार कणके हे गांगरुन गेले होते. ते चक्क एका कोपर्‍यात थांबले होते. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनादेखील प्रचंड गोंधळाच्या वातावरणामुळे काही करावे हे सूचनासे झाले. यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. वल्याळ यांनीही भारुड यांची भेट घेऊन तक्रार केली. सायंकाळी सहाच्या सुमारास वल्याळ आदी मंडळी सदर बझार पोलिस ठाण्यात अर्ज पळविल्याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेले. नगरसचिव कार्यालयात झालेला प्रकार गंभीर असल्याने आपण पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवू, असे आश्‍वासन भारुड यांनी दिल्याची माहिती वल्याळ यांनी दिली. वादग्रस्त ठरलेल्या  या निवडणुकीविषयी पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवू : भारुड

नगरसचिव कार्यालयात झालेला प्रकार गंभीर असल्याने आपण पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवू, असे आश्‍वासन भारुड यांनी दिल्याची माहिती वल्याळ यांनी दिली. वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीविषयी पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.