Mon, May 20, 2019 22:39होमपेज › Solapur › आयुक्‍तांना टँकर घोटाळ्याच्या पुराव्यांचे ‘गिफ्ट’ 

आयुक्‍तांना टँकर घोटाळ्याच्या पुराव्यांचे ‘गिफ्ट’ 

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

एरवी मनपा अधिकारी-कर्मचार्‍यांच्या गैरकारभाराबाबत पुरावे देण्याची मागणी करणार्‍या आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांना शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी टँकर घोटाळ्याबाबत पुराव्यांची भेट देऊन कारवाईची मागणी केली.

मनपाचे अधिकारी व मक्तेदार संगनमताने पाण्याच्या टँकरबाबत घोटाळा करीत असल्याचा आरोप नगरसेवक वल्याळ व भोसले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी केला होता. दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट अधिकारी-मक्तेदारांकडून होत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. याबाबतचे पुरावे शुक्रवारी आयुक्तांना देण्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

ठरल्यानुसार शुक्रवारी सायंकाळी वल्याळ, भोसले यांनी श्रीनिवास करली, संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरुड, जुगन अंबेवाले, राजश्री बिराजदार आदी नगरसेवकांसमवेत आयुक्तांची भेट घेतली. पुरावे असलेली कागदपत्रे चक्क गिफ्टसारखे पॅक करुन त्याची भेट यावेळी आयुक्तांनी देण्यात आली.  याबरोबरच दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदनही त्यांनी सादर केले. 

झोन क्र. 2 टँकर खेपांची संख्या लक्षात घेता त्याचे बिल 88 हजार इतके असताना प्रत्यक्षात 3 लाख 88 हजारांचे बिल अदा करण्यात आले. एका झोनसाठी वार्षिक 15 लाखांची तरतूद असताना या झोनने 89लाखांची रक्कम अदा केली. याशिवाय एकाच बिल क्रमांकावर दोन वेगवेगळ्या रकमा अदा केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पाणीपुरवठा केंद्राचे रजिस्टर, झोन अवेक्षकच्या नोंदी तसेच मक्तेदाराचे रजिस्टर यामध्ये ताळमेळ नसल्याने गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा मुद्दाही या निवेदनात मांडण्यात आला आहे. चौकशी झाल्याशिवाय मक्तेदाराची बिले अदा करणार नाही, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी दिली.