होमपेज › Solapur › सेनेच्या सहकार्याने भाजपची बाजी 

सेनेच्या सहकार्याने भाजपची बाजी 

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 18 2018 12:22AMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या सातही विशेष समिती सभापतिपदाच्या निवडी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी अविरोध होण्याची औपचारिकता पूर्ण झाली. या निवडणुकीसाठी भाजप-सेनेची झालेली युती ही यापुढील काळात शहर विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्‍वास मनपा सभागृह नेते संजय कोळी यांनी निवडीनंतर व्यक्‍त केला. बुधवारी सातही समित्यांच्या सभापतिपदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले.  सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोेधी पक्ष शिवसेना यांच्यात या निवडणुकीसाठी समझोता होऊन युती झाली.

वाटाघाटीत भाजपने सेनेला तीन समित्या देण्याची तयारी दर्शविली. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप या विरोधी पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. बुधवारी महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपच्या रामेश्‍वरी बिर्रु, वैद्यकीय सहाय व आरोग्य समितीसाठी भाजपच्या वरलक्ष्मी पुरुड, कामगार व समाजकल्याण समितीसाठी भाजपचे रवी कय्यवाले, शहर सुधारणा समितीसाठी भाजपच्या शालन शिंदे, स्थापत्य समितीसाठी शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर, विधी समितीसाठी शिवसेनेचे  विनायक कोंड्याल, मंडया व उद्यान समितीसाठी शिवसेनेच्या कुमुद अंकारम यांनी अर्ज दाखल केले. 

प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज आल्याने ही निवडणूक अविरोध झाल्यात जमा होती. गुरुवारी  झालेल्या निवडणुकीवेळी ही औपचारिकता पूर्ण झाली. पीठासन अधिकारी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड होते. छाननी, माघार याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडी अविरोध झाल्याचे त्यांनी घोषित केले. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सभागृह नेते संजय कोळी म्हणाले, केंद्र व राज्यात भाजप-सेनेची युती आहे. आता सोलापूर मनपातही युती झाल्याचा आनंद आहे. युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. आगामी 4 वर्षात चांगल्या पद्धतीने कारभार करुन शहराचा विकास साधणार आहोत. रखडलेले बजेट लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर शशिकला ब त्तुल, राजकुमार हंचाटे, श्रीनिवास करली, संगीता जाधव, श्रीकांचना यन्नम, राधिका पोसा आदी उपस्थित होते