Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › बबनदादांच्या कारखान्यावर कोकाटे तज्ज्ञ संचालक!

बबनदादांच्या कारखान्यावर कोकाटे तज्ज्ञ संचालक!

Published On: Feb 28 2018 7:48AM | Last Updated: Feb 28 2018 7:48AMमाढा : वार्ताहर  

माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त संचालक म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांची नियुक्ती होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोकाटे हे आ. शिंदे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शिंदे यांची चिंता वाढणार आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 मध्ये सुधारणा झाल्याने शासनाचे भागभांडवल असणार्‍या संस्थांच्या संचालक मंडळावर शासननियुक्त प्रतिनिधी नेमण्यात येतो. पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्यासही काही प्रमाणात शासकीय भागभांडवल आहे. त्यामुळे याठिकाणी शासननियुक्त संचालक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांचे नाव शासनाच्या सहकार खात्याकडून फिक्स करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. याविषयी सहकार खात्याकडून आवश्यक ती माहिती पत्रव्यवहाराद्वारे घेतली जात आहे.

संजय कोकाटे हे  आ. बबनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासून आ. शिंदे यांचे वर्चस्व आहे. सध्या कोकाटे हे कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डुवाडी या संस्थेवर शासननियुक्त संचालक म्हणून काम करत आहेत. याही संस्थेवर शिंदे बंधूंचे वर्चस्व आहे. पंधरा दिवसांपूर्वीच या संस्थेत अनेक गोष्टींत अनियमितता असून लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे त्याची चौकशी व्हावी, असा आरोप करून कोकाटे यांनी माढा तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. यानंतर सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत टेंभुर्णी येथे भाजपचा मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यात सहकारमंत्र्यांनी शिंदे बंधूंच्याविरोधात कडवी भूमिका घेत माढा तालुक्यात ‘चित भी मेरी पट भी मेरी’ अशी शिंदेंची भूमिका असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्र्यांचे समर्थक असलेल्या संजय कोकाटे यांच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर शासननियुक्त संचालक करण्याच्या हालचालीस गती मिळाली आहे. संजय कोकाटे यांची वर्णी कारखान्यावर लागल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणाची वर्णी लागणार याचीही उत्सुकता असणार आहे. 

माढेकरांना डिवचण्याचा सहकारमंत्र्यांचा प्रयत्न...
माढ्यात आ. बबनदादा आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचा एकछत्री अंमल असून संजयमामा हे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटातील म्हणून ओळखले जातात. आपल्याकडे ग्रामीण भागाची जबाबदारी असतानाही माढेकर आपल्याकडे येत नाहीत याचे शल्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आहे. त्यामुळेच कोकाटेंच्या माध्यमातून माढेकरांना डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगत आहे.