Tue, Jul 23, 2019 02:03होमपेज › Solapur › बापूंनी सोडला प्रशासकांच्या खांद्यावरून निवडणुकीसाठी साप!

बापूंनी सोडला प्रशासकांच्या खांद्यावरून निवडणुकीसाठी साप!

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 23 2018 12:09AMसोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होत असतानाच भाजपने विशेषता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी 40 कोटींच्या गैरव्यवहाराचा साप प्रशासकांच्या खांद्यावरून सोडला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होत होती. विशेष बाब म्हणजे या तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करताना अनेक तांत्रिक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. सहकार तत्त्वावर चालणार्‍या अनेक संस्थांत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह कोणत्याही नामांकित संस्थेवर ठोस अशी कारवाई करण्यात आली नाही. सोलापूर बाजार समितीची निवडणूक सुरु होत असल्याने मागील प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आणून याप्रकरणी गुन्हा दाखल करून काँग्रेसच्या अंगावर साप सोडण्याची भूमिका सहकारमंत्री गटाकडून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती ही राज्यातील अग्रेसर व नफ्यात असणारी संस्था असल्याने या संस्थेत सत्ता काबीज करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख व माजी आ. दिलीप माने यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गत दोन महिन्यांत माजी आमदार दिलीप माने यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित मोट बांधली आहे. आ. सिध्दाराम म्हेत्रे, बाजार समितीचे माजी प्रभारी सभापती सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आदी नेते एकत्रित झाल्याने ना. सुभाष देशमुख यांच्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे. अशातच पालकमंत्री गटाचा छुपा विरोध निवडणुकीत उलटला, तर निवडणुकीत टांगा पलटी होण्याची भीती सहकारमंत्री गटाला निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. 

बाजार समिती कर्मचारी नेमणे, बँकेत ठेव ठेवणे, अंतर्गत रस्त्यातील गैरप्रकार आदींसह 14 विषयांबाबत काँग्रेसचेच माजी सभापती राजशेखर शिवदारे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर त्याचवेळी कारवाई होणे अपेक्षित होते. तसे न होता जुनेच प्रकरण पुन्हा खोदून या विषयाचा साप सोडून काँग्रेसला विषबाधा पोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. मंंद्रुप येथील अकोले येेथे घेण्यात आलेल्या नळपाणीपुरवठा योजना शुभारंभाप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी काही दिवसांपूर्वीच बाजार समितीमधील गैरव्यवहार चार दिवसांत समोर येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे साप सोडण्याचे काम नियोजितच होते, अशीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. बाजार समितीसाठी पहिल्यांदाच मतदार म्हणून असलेल्या शेतकर्‍यांत याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहे.  बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.