Fri, Jul 19, 2019 07:46होमपेज › Solapur › भाजप सरकार लोकशाहीवरील संकट : शरद पवार

भाजप सरकार लोकशाहीवरील संकट : शरद पवार

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 2:04AMपंढरपूर : प्रतिनिधी

एक महिन्यापूर्वी तोटा भरून काढण्यासाठी बँकांना 81 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आणि निरव मोदी 11 हजार कोटी रुपये घेऊन पळून गेले. 2016 मध्येच पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून जबाबदार व्यक्‍तींनी निरव मोदी पळून जातील, याची कल्पना दिली होती. तक्रार मोदी विरुद्ध आणि राज्यकर्ते मोदी म्हणून याकडे दुर्लक्ष झाले असावे. तसेच हे सरकार लोकशाही समाजव्यवस्थेवरचे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करत आहोत. तुम्हीही आमच्या पाठीशी उभे राहा, असेही आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केले.

वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. तानाजी चोरगे यांना वसंतराव काळे साहित्यकृती पुरस्कार, गंगाधर म्हमाणे यांना शैक्षणिक पुरस्कार, नवनाथ कसपटे यांना कृषिभूषण पुरस्कार तर डॉ. दिलीप शिंदे यांना समाजभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. 

यावेळी  खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंत डोळस, आ. गणपतराव देशमुख, आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. दत्तात्रय सावंत, माजी आ. दिलीप माने, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राजूबापू पाटील, बळीरामकाका साठे, बाळासाहेब शेळके, समाधान काळे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील  महत्त्वाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

खा. पवार म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली.ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांना  प्रश्‍नांची जाणीव नाही म्हणून शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागले 
आहेत. या सरकारची धोरणे चुकीची आहेत. 

उत्पादकापेक्षा खाणार्‍यांचा हे सरकार विचार करते आहे. शेतकरी सक्षम झाला तरच अर्थव्यवस्था सक्षम होईल. म्हणून युपीए सरकारच्या काळात शेतकरी सक्षम करण्याचे काम केले. मात्र, हे सरकार शेतकर्‍यांना न्याय देऊ शकत नाही. शेतमालाचा हमीभाव हे लबाड घरचे  आवतन असल्याचा पुनरुच्चार पवारांनी यावेळी केला.     

माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, युपीए सरकारच्या काळात शेतमालास हमीभाव वाढवून दिला. तांदुळ, गव्हाच्या निर्यातीत देशाने पहिला क्रमांक मिळवला होता. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आणि शेतकरी सक्षम केला होता. मात्र सध्या देशात ज्या प्रकारे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे पाहिले जात आहे ते पाहता हे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. गुजरातपाठोपाठ राजस्थानच्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी धक्का दिल्यामुळे या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ.भारत भालके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक कल्याणराव काळे यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांचा पाढा वाचला. भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्यात यावेत, त्याशिवाय सोलापूरला पाईपलाईनने पाणी देऊ नये, राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हे चुकला असून त्याचा फेर सर्व्हे करण्यात यावा. तसेच मध्य रेषा पकडून भुसंपादन करावे, संपूर्ण वीज बील माफी आणि संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशा मागण्या यावेळी केल्या. दिनकर चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.