Sat, Nov 17, 2018 03:43होमपेज › Solapur › लाचखोर सहायक शिक्षण उपनिरीक्षकास अटक

लाचखोर सहायक शिक्षण उपनिरीक्षकास अटक

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी. सांकेतिक क्रमांक नूतनीकरणासाठी 2500 रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील सहायक शिक्षण उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात करण्यात आली.

सूर्यकांत रामचंद्र सुतार (वय 53, रा. आदित्यनगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या सहायक शिक्षण उपनिरीक्षकाचे नाव असून याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांची जाणता राजा बहुउद्देशीय  शिक्षण  प्रसारक मंडळाच्या अंतर्गत  कनिष्ठ  महाविद्यालय   आहे. या महाविद्यालयाचा एस.एस.सी. सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करावयाचा असल्याने तक्रारदाराने माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर शिफारस  पत्र देण्यासाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक सुतार यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2500 रुपये देण्याचे ठरले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सापळा लावला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून 2500 रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कार्यालयातच सहायक शिक्षण उपनिरीक्षक सुतार यांना रंगेहाथ अटक केली.