Fri, Sep 21, 2018 03:37



होमपेज › Solapur › सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यात हाणामारी

सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यात हाणामारी

Published On: Apr 21 2018 10:38PM | Last Updated: Apr 21 2018 10:37PM



सोलापूर : प्रतिनिधी

शहर पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानासमोर असलेल्या वसंत नगर पोलिस लाईनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकामध्ये लहान मुलांच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरेखा देविदास करंडे (वय 36, रा. बिल्डिंग नं. 1, रूम नं. 7, वसंतनगर पोलिस लाईन, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सहायक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्षवर्धन (रा. पीएसआय बिल्डिंग, वसंतनगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हर्षवर्धन विश्‍वास भांबड (वय 11) याच्या फिर्यादीवरून देविदास करंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुरेखा यांचे पती देविदास करंडे हे पोलिस  उपनिरीक्षक  असून हर्षवर्धन याचे वडील विश्‍वास  भांबड  हे  सहायक पोलिस निरीक्षक म्हणून सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी हर्षवर्धन याची आर्यन करंडे याच्यासोबत क्रिकेट खेळण्यावरुन बाचाबाची झाली होती. तो प्रकार मिटला होता. परंतु, आर्यनचे वडील देविदास करंडे हे मैदानात येऊन माझ्या मुलास का चिडवतोस, असे म्हणून त्यांनी हर्षवर्धन यास विनाकारण हाताने गालावर चापट मारून शिवीगाळ केली. म्हणून हर्षवर्धन याने सदर बझार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक करंडे यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सहायक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्षवर्धन हे करंडे यांच्या अल्पवयीन मुलीला व मुलाला गोल फेर्‍या मारुन अश्‍लिल शब्द बोलत होते. त्यावेळी करंडे यांच्या पत्नीने भांबड यांना असे का बोलता, असे विचारले असता भांबड यांनी त्यांना शिवीगाळ करुन निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी रात्री करंडे  हे मुलांसोबत बाहेर जात असताना भांबड व त्यांच्या मुलाने मुलांना अश्‍लिल बोलून चिडवून करंडे यांना तुला माज आला आहे, तुझा माज उतरवितो असे बोलून अपमान करुन शिवीगाळ केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात करंडे यांच्या पत्नीने फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.