Mon, Jul 22, 2019 00:34होमपेज › Solapur › शिवसेना जिल्हाप्रमुखांची आगामी निवडणुकीत ‘कसोटी’  

शिवसेना जिल्हाप्रमुखांची आगामी निवडणुकीत ‘कसोटी’  

Published On: Aug 28 2018 1:46AM | Last Updated: Aug 27 2018 10:09PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील पक्षनेतृत्वात खांदेपालट झाली आहे. मात्र  जुन्या आणि नव्या नेत्यांचा समन्वय साधून नव्याने नियुक्‍त केलेल्या पदाधिकार्‍यांसमोर विधानसभा आमदारकीत चांगलीच कसोटी लागणार आहे. 

अकरा विधानसभा जागांचा विचार करता त्यापैकी करमाळा एकच विधानसभा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे हे ऐवढे मोठे ‘शिवधनुष्य’ पेलणे मोठे आव्हान ठरणार आहे. नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी तरी वेळेत झाल्या असून त्यांच्याकडे निवडणुकीसाठी व्युहरचना आखण्याकरिता बराचसा वेळ असणार असल्याने ही बाब जमेची ठरणार आहे. 

नूतन तीन जिल्हाप्रमुखांत  अनुभवी महेश कोठेंची फेरनिवड आणि नगरसेवक गणेश वानकर आणि पंढरपूरचे भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य तथा पंढरपूर तालुकाप्रमुख संभाजी शिंदेंना  बढती  देऊन तीन जिल्हाप्रमुखांच्या निवडी झाल्या आहेत. थोडक्यात, जिल्हाप्रमुख पद तिघांत विभागून देण्यात आले आहे. प्रत्येकांना लक्ष देणे सोपे जावे म्हणून कार्यक्षेत्रही विभागून दिले आहे. त्यामुळे त्यांना आपले काम दाखवण्यास वाव मिळणार आहे. 

मात्र जिल्ह्यातील मातब्बर नेते असलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, पुरूषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे यांना बाजूला सारुन  आमदारकीच्या निवडणुकीसाठी ही नवीन टीम तयार केल्याने यांच्याकडून कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमधून अपेक्षा वाढल्या आहेत. बाजूला सारलेल्यांवरही वेगळी कामगिरी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.  नूतन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी पक्षातील गटबाजीवर भाष्य करताना नूतन जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंतांकडे सर्वांची कुंडली असून बैठका, मेळावे घेऊन चर्चा करुन गट-तट मिटवण्यावर भर असून येणार्‍या सप्टेंबरमध्ये जिल्ह्याचा मोठा मेळावा घेणार असल्याचे सांगितले आहे.

महापालिकेचा आणि विधानसभेचा दांडगा अभ्यास असणार्‍या महेश कोठे यांच्याकडे सोलापूर दक्षिण, उत्तर, मध्य या तीन मतदारसंघांमध्ये सेनेचे आमदार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांनीही मध्यमधून पक्षाकडून आमदारकी लढविली आहे. तर नगरसेवक आणि वानकर घराण्याचा लौकिक असलेले गणेश वानकर यांनीही दक्षिणमधून आमदारकी पक्षाकडून लढविली. त्यामुळे त्यांना झालेल्या चुकांची जाणीव असल्याने या निवडणुकीत त्या चुका सुधारून  सेनेचे जादा आमदार कसे निवडून येतील, यावर यांना भर द्यावा लागणार आहे. तरच ‘मातोश्री’वर त्यांचे ‘वजन’ राहणार आहे.  गणेश वानकर यांच्याकडे बार्शी, मोहोळ, अक्‍कलकोट, मंगळवेढ्याची जबाबदारी आहे. 

लोकसभेविषयी शांतता 
शिवसेना आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावरून जादा सख्य राहिले  नसल्याचे वारंवार होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून दिसून येत आहे. अशात नुकत्याच झालेल्या शिवसेना वर्धापनावेळी पक्षप्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. पदाधिकार्‍यांमध्ये विधानसभेविषयी चर्चा असते; मात्र लोकसभेविषयी शांतता दिसून येत आहे. काँग्रेसच्या एका नेत्यास शिवसेनेत घेऊन त्यास सोलापुरातून उभे करण्याच्या हालचाली चालू असल्याचे वृत्त असले तरी त्यास अद्याप कोणी दुजोरा दिला  नाही.