Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › विठ्ठल नामे अवघी दुमदुमली पंढरी

विठ्ठल नामे अवघी दुमदुमली पंढरी

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:14PMपंढरपूर : प्रतिनिधी

विठ्ठलमय होऊन पंढरीत आलेल्या लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रेचा सोहळा झाला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील अनिल जाधव दाम्पत्याच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी 15 लाखांवर वारकर्‍यांनी आषाढी एकादशीसाठी पंढरीत हजेरी लावली आणि चंद्रभागेत पवित्र स्नान केले.

यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा सोमवारी (दि. 23 जुलै) होता. त्याकरिता आळंदी, देहूसह राज्याच्या विविध भागांतून आणि गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही पालखी सोहळे, हजारो दिंड्या शनिवारीच पंढरीत दाखल झालेल्या होत्या. मराठा, धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनासह वारकरीही काहीसे तणावात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेत, महापूजेला येण्याचे टाळले आणि संपूर्ण आषाढीचा सोहळा मोकळेपणाने, भक्‍तिभावाने परंपरेनुसार दिमाखात साजरा झाला. पहाटे श्रींची शासकीय महापूजा दर्शन रांगेतील मानाचे वारकरी अनिल जाधव आणि त्यांच्या पत्नी वर्षा अनिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. अनिल देसाई, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ. साधना भोसले, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत महापूजा झाली.

त्यानंतर संपूर्ण पंढरीनगरी विठ्ठलनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात शनिवारी रात्रीपासूनच टाळ, मृदंगाच्या निनादात भजन, कीर्तन आणि प्रवचन रंगले होते. नदीपलीकडच्या 65 एकर परिसरात तर प्रतिपंढरपूर वसले होते. सुमारे 450 दिंड्यांतून आलेले दोन ते अडीच लाख वारकरी हरी भजनात दंग झाले होते.एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच चंद्रभागेत स्नानाकरिता भाविकांची रीघ लागली होती. मानाचे पालखी सोहळे आणि दिंड्यांनी प्रदक्षिणा मार्गावरून पालख्यांची ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात मिरवणूक काढली. तत्पूर्वी चंद्रभागेच्या पाण्यात पादुका स्नान घालण्यात येत होते. तेथून 

महाद्वारातून संत नामदेव 

पायरीजवळ येऊन विठ्ठल मंदिर कळसाचे दर्शन घेऊन वारकरी नगर प्रदक्षिणा घालून आपल्या मठात, मंदिरात, धर्मशाळेत परत जात होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रदक्षिणा मार्गावरून विठ्ठलाच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.

दर्शन रांगेत दीड लाखांवर भाविक

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली होती. दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत गेली होती. एकादशी दिवशी दर्शन करून बाहेर पडलेल्या वारकर्‍यांनी सांगितले की, 35 तासांच्या प्रतीक्षेनंतर विठ्ठलाचे दर्शन झालेले आहे. संपूर्ण दर्शन रांगेत मंदिर समितीने पिण्याचे पाणी, साबूदाणा खिचडीचे वाटप केले होते. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांतून यावर्षी समाधान व्यक्‍त होत आहे.

कडक बंदोबस्त

मराठा, धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात जास्तीचा बंदोबस्त मागवला होता. सुमारे 10 हजार पोलिसांचा फौजफाटा पंढरीत बंदोबस्तासाठी होता. कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू पंढरीत फिरून बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. भल्या पहाटे चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीवर वारी पोहोचवून बहुतांश वारकर्‍यांनी दुपारनंतर पंढरीचा निरोपही घेतला. एकूणच सर्व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुमारे 15 लाखांवर भाविक येऊनही आषाढीचा सोहळा सुखाचा, आनंददायी झाला.

पहिल्यांदाच वारकर्‍याच्या हस्ते शासकीय महापूजा

श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा मुख्यमंत्री आले नाहीत आणि त्यांनीच जाहीर केल्यामुळे दर्शन रांगेत उभा असलेल्या पती-पत्नी वारकर्‍यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. पहिल्यांदाच एका वारकर्‍यास एवढ्या मोठ्या पूजेचा मान मिळाला आहे.