होमपेज › Solapur › देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग

देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 9:56PMसोलापूर : प्रतिनिधी 

‘टाळ बोले चिपळीला 
नाच माझ्या संग,
देवाजीच्या व्दारी आज 
रंगला अभंग...’

या अभंगाप्रमाणे आज आषाढी एकादशीच्यानिमित्ताने सर्व विठ्ठल मंदिरांत दिवसभर भजन-कीर्तनातून टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग रंगले आणि सोलापूर जणू पंढरीप्रमाणे दुमदुमून गेले. सोलापुरातील जुने विठ्ठल मंदिर, चौपाड मंदिर, पद्मशाली चौक या सर्व मंदिरांत पहाटे साडेपाचला काकडा आरती झाली. त्यानंतर सर्वच मंदिरांत आज विठ्ठलाला दह्या-दुधाचा अभिषेक करुन महापूजा करण्यात आली. त्यानंतर  दुपारी अकरापासून ते रात्री दहापर्यंत विविध महिला भजनी मंडळांच्या भजन-कीर्तनाने अवघे मंदिर दुमदुमून गेले.जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये आज धार्मिक कार्यक्रमांबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे 15 जणांनी रक्तदान करत एकादशी साजरी केली. चौपाड विठ्ठल मंदिरामध्ये आज भाविकांना मोफत राजगिरा लाडू व केळीचे वाटप करण्यात आले. 

पूर्व भागातील पद्मशाली चौकातील श्री गणेश विठ्ठल मंदिरात आज  दुपारी होमहवन करण्यात आले. सर्वच मंदिरांत आज भाविकांची आणि विशेषतः महिला भाविकांची प्रचंड गर्दी होती.जुन्या विठ्ठल मंदिरातील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हरिभाऊ जोशी, आनंद जोशी, गजानन जोशी, विजया जोशी यांनी, चौपाड विठ्ठल मंदिरात रमेश खरात, भारत भागानगरे, इटाई धावडे यांनी, तर श्री गणेश विठ्ठल मंदिरात अल्ली परिवार, शिंगोटकर परिवार, कोलकुंदी परिवार, वांजरे परिवार व श्री गणेश विठ्ठल पद्मशाली मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

विठ्ठल-रुक्मिणीला साजशृंगार

आषाढी एकादशीच्यानिमित्ताने आज सर्वच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये मूर्तीला साजशृंगार करण्यात आला होता. चौपाड विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला चांदीचा मुकूट, विठ्ठलास लाल उपरणे, तर रुक्मिणीस निळा शालू परिधान करण्यात आला होता. दोहांच्या गळ्यात गुलाब आणि झेंडूच्या फुलांचे हार होतेे. जुन्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मूर्तीस चांदीचे मुकूट, तुळशीच्या जाड माळा, गुलाब-शेवंतीच्या फुलांनी सजविण्यात आले होते. श्री गणेश विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीला  सोन्याचे मुकूट, निळ्या रंगाची अंगी, गुलाबी उपरणांनी सजविण्यात आले होते. 

शुभराय महाराज रथयात्रेला गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त दत्त चौकातील शुभराय मठातून आज ‘श्रीं’ची रथयात्रा निघाली. गावठाण भागातून रथयात्रा जाताना अनेक भाविकांनी ‘श्रीं’चेे दर्शन घेण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती.