होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांची महापूजा आंदोलनाच्या घेर्‍यात 

मुख्यमंत्र्यांची महापूजा आंदोलनाच्या घेर्‍यात 

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:36PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेकरिता पंढरपूरला येणार्‍या मुख्यमंत्र्यांना विविध सामाजिक संघटनांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार असून 16 संघटनांनी विविध प्रकारच्या प्रश्‍नांवरून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त करीत मुख्यमंत्र्यांची महापूजा होऊ दिली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर सामाजिक स्तरावरून राज्यसरकारच्या विरोधात लोकभावना तीव्र झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भात पोलिसांकडून  सामाजिक भावना तीव्र विरोधात असल्याचा 4 पानी गोपनीय अहवाल गृह विभागाला पाठवल्याची माहिती आहे.

23  जुलै रोजी होणार्‍या आषाढी  एकादशीसाठी  राज्याचे मुख्यमंत्री 22 जुलै रोजी येणार आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या महापूजेस येण्यास मराठा क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोळी समाज, विश्‍व वारकरी सेना, रिपाइं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित शेतकरी संघटना यासह विविध 16 संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांनी आषाढी यात्रेसाठी येऊ नये; अन्यथा त्यांना कोणत्याही परिस्थितीत रोखले जाईल, अशा इशारा दिला आहे. त्याचबरोबर लाखो वारकर्‍यांच्या गर्दीत वारकरी वेषात, गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांना कुठेही, कसेही रोखले जाईल. 

कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले जाईल असा इशारा दिल्यामुळे  या आंदोलकांना कसं रोखायचं असा प्रश्‍न पोलिस प्रशासनापुढे उभा राहिला आहे. विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनासाठी गावो-गाव बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरू केल्याची गोपनीय माहिती पोलीस खात्याकडे मिळाली आहे. त्यामुळे पंढरपूर पोलीसांकडून गृहविभागास येथील सामाजिक भावना तीव्र असल्याचा 4 पानी गोपनीय अहवाल पाठवला आहे. त्यामुळे या अहवालाची दखल घेऊन मुख्यमंत्री शासकीय महापूजेला येणे टाळतात की आश्‍वासनांचा पेटारा घेऊन विठ्ठलाच्या भेटीला येतात याकडे लक्ष लागले आहे.