Fri, Jul 19, 2019 07:40होमपेज › Solapur › टोकन दर्शनाचा नवीन जुमला

टोकन दर्शनाचा नवीन जुमला

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:26PMपंढरपूर : प्रतिनिधी

सवंग आणि लोकप्रिय अशा वारेमाप घोषणा करणार्‍या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने टोकन दर्शन पद्धतीचा नवीन जुमला जाहीर केला आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन दर्शन बुकिंगची पद्धत अतिशय चांगल्याप्रकारे चालू असताना यात्राकाळात ती यंत्रणा बंद ठेवण्यात येते. मग त्याच प्रकारची टोकन दर्शन पद्धत कशी काय यशस्वी होईल, असा प्रश्‍न वारकर्‍यांपुढे उभा राहिला आहे. 

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आलेले लाखो भाविक मोठ्या यात्राकाळात ऊन, वारा, पाऊस, चिखल याची तमा न बाळगता पदस्पर्श दर्शनाकरिता 18 ते 20 तास रांगेत उभे राहतात. आषाढी यात्रेच्याकाळात एका दिवशी सरासरी 35 ते 40 हजार भाविक 24 तासांत दर्शन करून बाहेर पडतात. या भाविकांना दर्शन रांगेत किमान सुविधा पुरवण्यात मंदिर समितीला आजवर यश आलेले नाही. दर्शन सुलभ व्हावे याकरिता भरीव काही करण्यात अपयश आल्यानंतर मंगळवारी मंदिर समितीने बैठक घेऊन टोकन दर्शन पद्धत राबवण्याचे जाहीर केले आहे.

त्रिलोक्य सुरक्षा कंपनीला टोकन वितरणाचे काम दिले आहे. सध्या ही कंपनी शिर्डी, तुळजापूर येथे हे काम करीत आहे. त्याकरिता पंढरपुरात 20 ठिकाणी टोकन वितरण यंत्रणा उभा केली जाणार असून भाविकांना टोकन दिल्यानंतर त्यावर त्याच्या दर्शनाची तारीख, वेळ निश्‍चित केली जाणार आहे. वरवर पाहता ही व्यवस्था अतिशय सुलभ वाटत असली तरी पंढरपुरात येणार्‍या 12 ते 15 लाख भाविकांच्या दर्शन वेळेचे नियोजन टोकन पद्धतीने कसे केले जाणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिर्डी, तुळजापूर, तिरूपती याठिकाणी अशा पद्धतीचा वापर केला जात असला तरी पंढरपूची एकूणच परिस्थिती वेगळी आहे. येथे येणारा भाविक, त्याची खर्च करण्याची क्षमता, पंढरपूर शहरात त्याचा मुक्काम करण्याचा कालावधी, येथील सर्व वारकर्‍यांच्या निवासाची उपलब्ध असलेली  व्यवस्था लक्षात घेता टोकन पद्धत यशस्वी होईल, असे दिसत नाही. 

भाविकांच्या सोयीसाठी उदात्त हेतूने  मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन  बुकिंग सुविधा  सुरू केली आहे.  मात्र गेल्या आषाढी यात्रेपासून यात्राकाळातच ही सुविधा बंद ठेवावी लागत आहे. ऑनलाईन दर्शन बुकिंग जगभरात कुठूनही करता येते आणि दर्शन वेळ निश्‍चित केल्यानंतर सोयीने पंढरपुरात येणे भाविकांना शक्य होते. मात्र टोकन दर्शनासाठी त्याला  पंढरपुरात  यावे लागणार असून इथे आल्यानंतर टोकन घ्यावे लागणार आहे. दररोज 40 हजार भाविक जरी दर्शन घेणार असतील तर 40 हजार टोकन वितरित करावे लागणार आहेत.

आषाढी, कार्तिकी यात्रेच्या काळातील टोकन मिळवण्यासाठी वारकर्‍यांना किमान आठ दिवस अगोदर पंढरपुरात येऊन टोकन घ्यावे लागणार आहे. अलीकडे पंढरीत येऊन एका दिवसात परत जाण्याचा भाविकांचा ट्रेंड वाढलेला आहे. पूर्वी आषाढी यात्रेच्याकाळात पौर्णिमेपर्यंत राहणारे वारकरी  हल्ली द्वादशीच्या दिवशीच गावाकडे परत जातात. राहण्या-जेवण्यापासूनचा खर्च लक्षात घेता सामान्य भाविकांना आता पंढरीत राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर टोकन घेऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुन्हा 4 दिवस पंढरपुरात मुक्काम करू शकणार आहेत का, असाही सवाल उपस्थित होत आहे. 

सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन दर्शन बुकिंग पद्धतीसारखीच टोकन पद्धती आहे. ऑनलाईन दर्शन बुकिंग यात्रेच्याकाळात अलीकडे बंद ठेवण्यात येत आहे. विठ्ठलाचा भाविक कमी शिकलेला, तंत्रज्ञानाची माहिती नसलेला आणि वापर न करणारा असल्याचा समज आहे. मात्र प्रत्येकाच्या हाती सध्या इंटरनेटयुक्त मोबाईल आलेला  असून वारकरीसुद्धा आता ऑनलाईन झालेले आहेत. ऑनलाईन दर्शन बुकिंगला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहिला असता हीच यंत्रणा अधिक सक्षमपणे राबवली तर टोकन दर्शनाला चांगला पर्याय ठरली असती. ही ऑनलाईन दर्शन बुकिंग सुविधा सुरू केल्यानंतर पहिल्या आषाढी यात्रेवेळी सुमारे 60 हजारांवर भाविकांनी अगोदर बुकिंग करून विठ्ठल दर्शन घेतले होते. नंतर दोन वर्षे आषाढीसह सर्वच यात्रांच्या काळात हजारो भाविक ऑनलाईन बुकिंग करून निश्‍चित वेळेत विठ्ठल दर्शन घेत होते. परंतु मागील दोन वर्षांपासून चारही प्रमुख यात्रांच्या काळात ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेली ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद ठेऊन त्याच प्रकारची टोकन दर्शन व्यवस्था पंढरपूरसारख्या ठिकाणी कितपत व्यवहार्य आणि सोयीची ठरणार आहे, असा सवाल भाविकांतून उपस्थित होत आहे.

 
ऑनलाईन बुकिंग व्यवस्था ठरली उपयुक्‍त

भाविकांना आपली दर्शन वेळ निश्‍चित करून रांगेत उभे राहणे टाळता यावे यासाठी 5 वर्षांपूर्वी ऑनलाईन बुकिंग व्यवस्था सुरू केली.
पहिल्याच आषाढी यात्रेच्याकाळात 60 हजारांवर भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेतले होते. 
ऑनलाईन बुकिंग करताना पासवर भाविकाचा फोटो, त्याचे नाव, दर्शन तारीख आणि वेळ असल्यामुळे पासचा काळा बाजार करण्यास कसलाच वाव राहिला नव्हता.
राज्यभरातून ऑनलाईन बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळात होता. यशस्वी आणि अधिक सुलभ ठरलेली ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था मंदिर समिती यात्राकाळात  मात्र बंद ठेवते.
टोकन दर्शन पद्धतीपेक्षा ऑनलाईन बुकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असताना मंदिर समिती तिकडे दुर्लक्ष करून टोकन व्यवस्था सुरू करू पाहात आहे.

यात्राकाळात टोकन पद्धत चालणार का ?
एकट्या आषाढी यात्रेला किमान 15 लाख भाविक येतात. त्यापैकी 24 तास दर्शनकाळात सुमारे 5 ते 6 लाख भाविक पदस्पर्श दर्शन घेतात. त्यापेक्षा जास्त भाविक  मुख दर्शन घेऊन जातात. टोकन घेण्यासाठी भाविकांना पंढरीत यावे लागणार आहे. टोकन मिळाल्यानंतर त्याला दर्शनाची तारीख, वेळ समजणार आहे. गर्दीच्या काळात भाविकांना किमान 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते. टोकनवर भाविकाचे नाव, फोटो नसल्याने त्याचा काळा बाजार आणि वितरणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून तो काळा बाजार कशा पद्धतीने रोखला जाणार, हा प्रश्‍न निर्माण होत आहे. यात्राकाळात दररोज किमान 30 ते 40 हजार टोकन वापर होणार. त्यामुळे टोकन मिळवण्यासाठी भाविकांची नव्याने रांगा लागण्याची शक्यता आहे.