होमपेज › Solapur › मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वर स्मारकास मंजुरी

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वर स्मारकास मंजुरी

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:35PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वर स्मारकास उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण 15 एकर जागेमध्ये महात्मा बसवेश्‍वर यांचे स्मारक उभे करणार आहे.

लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्‍वर यांचा मंगळवेढा या गावाशी ऐतिहासिक व पौराणिक संबंध आहे. त्या अनुषंगाने मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वर स्मारक व्हावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लागला आहे.

मंगळवेढा येथील कृषी पर्यटन विभागाच्या 65 एकर जमिनीमध्ये 15 एकर जागा महात्मा बसवेश्‍वर स्मारकास आरक्षित करण्यात आली आहे. स्मारकाच्या विकासाबरोबर कृषी पर्यटन केंद्रदेखील विकसित केले जाणार आहे. यासाठी एकूण 95 कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून महात्मा बसवेश्‍वर स्मारकास 15 कोटी खर्च केले जाणार आहेत. स्मारकामध्ये बसव मंटप, म्युझियम, यात्री निवास, बहुउद्देेशीय सभागृह, ध्यान मंदिर, प्रशासकीय इमारत, बसव सृष्टी, पार्किंग आदी सुविधांची  सोय केली जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. पुतळ्यासाठी 1 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे.

कृषी पर्यटन केंद्राचा विकास
मंगळवेढा येथे 50 एकर जागेत कृषी पर्यटन केंद्राचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये चिंचेची शेती, मत्स्यपालन, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, शेतकरी निवास, फुले-फळे-भाजी,  ग्रीन हाऊस, खिलार गाई गोठा यांचा विकास केला जाणार आहे.

महात्मा बसवेश्‍वर स्मारक विकास व कृषी पर्यटन केंद्र विकास याबाबतची  बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रशांत परिचारक, अ‍ॅड. एस.एम. हवनाळे, जी.एम. पटनी, मनोहर पटवारे, गुरुनाथ बडोरे आदी उपस्थित होते.