Sat, May 25, 2019 23:24होमपेज › Solapur › प्रशासक जिल्हा बँकेच्या रिकव्हरीच्या मागे

प्रशासक जिल्हा बँकेच्या रिकव्हरीच्या मागे

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:06PMसोलापूर ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्‍त केल्याने ठेवीदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही नूतन प्रशासक  बँकेची परिस्थिती चांगली असून भीतीचे कारण नसल्याचे सांगत दिलासा देत आहेत. दुसरीकडे  वसुलीच्यादृष्टीने दुसर्‍याच दिवशी बैठकावर भर दिला. 

कमालीची थकबाकी आणि नॉबार्डने त्रुटी दाखवून दिल्यानंतर मातब्बर नेते असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी गुरुवारी प्रशासक अर्थात जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी तालुक्यातील सर्व वरिष्ठ शाखा निरीक्षकांची बैठक घेतली. त्यांच्याकडून सर्व शाखांची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. 

खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेतील मोठमोठे पदे भोगलेले, माजी मंत्री असलेल्या संचालकांनीच कोट्यवधीची कर्ज बँकेतून घेतली. मात्र भरण्याचे नाव घेतले नाही. संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्ज वाटप केले होते. मूल्यांकन कमी असताना त्याच्या अधिकचे कर्ज दिले गेले. नियम धाब्यावर ठेवून वारेमाप कर्ज देऊन स्वकियांनीच बँकेवर कर्जाचा मोठा डोंगर उभा केला. परिणामी बँकेच्या शताब्दी महोत्सवात  प्रशासक नियुक्‍त करण्याची पाळी आली. जिल्ह्याचा विकास हा सहकारावरच झाला असला तरी चुकीच्या धोरणामुळे सहकाराचा स्वाहाकार झाल्याचे दिसून आले.  आता बँकेचा अधिकार प्रशासकाच्या हाती गेला तरी पूर्वीप्रमाणेच शेतकर्‍यांना कर्जाचे वाटप करवेच लागणार आहे. मात्र  मातब्बर नेत्यांकडून वसुली करुन घेणे प्रशासकासमोर मोठे आव्हान राहणार आहे. चालू संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्‍त झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वार्‍यासारख्या फिरू लागल्या आहेत. त्यात नेटकरी आपल्या जिल्ह्यातील बँक सुखरूप आहे का हे तपासण्याचे आव्हान करीत आहेत. या कारवाईने राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिल्हा बँकांवर परिणाम झाला आहे. 

प्रशासक नियुक्‍त झाल्याने ठेवीदारांना धसका, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना आता प्रशासक नियुक्‍त झाल्याने थकबाकी लवकर वसूल होऊन बँक पूर्वस्थितीत येईल, अशी आशाही वाटू लागली आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून निर्माण झालेली जिल्हा बँक सुस्थितीत यावी, अशी सर्वांचीच धारणा आहे.  

बँकेवर कर्जाचा डोंगर 

जिल्हा बँकेने 30 सहकारी व खासगी  साखर कारखान्यांना बिगरशेती  कर्ज दिले. बँकेच्या 14 संचालकांशी संबंधित सहकारी संस्था, खासगी कंपन्यांकडून 31 मार्च 2017 अखेर सुमारे 648 कोटी कर्ज व त्यावरील व्याज 223 कोटी येणे आहे. येणे कर्जांपैकी 351 कोटी मुद्दल व 223 कोटी व्याज असे एकूण 574 कोटी थकीत आहे. बँकेच्या संचालकांनी दहा साखर कारखान्यांना कर्ज मर्यादेचे  उल्लंघन करुन कोटींच्या घरात कर्जवाटप केले आहे.