Tue, Jul 07, 2020 08:37होमपेज › Solapur › अण्णासाहेब घोडके खून प्रकरण; आई आणि बहिणीने दिली सुपारी

अण्णासाहेब घोडके खून प्रकरण; आई आणि बहिणीने दिली सुपारी

Published On: Jul 18 2019 10:12AM | Last Updated: Jul 18 2019 9:54AM
मोहोळ : वार्ताहर

कुरुल येथील अण्णासाहेब घोडके खून प्रकरणात त्यांची आई आणि बहिणीला कामती पोलिसांनी अटक केली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याने आई आणि बहिणीने त्यांची सुपारी देऊन काटा काढल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. मालन सुरेश घोडके व बहीण शोभा नागेश कनमुटे अशी त्यांची नावे आहेत. मोहोळ न्यायालयाने दोघींना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत कामती पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अण्णासाहेब सुरेश घोडके (रा. कुरुल) यांची डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली होती. या प्रकरणी कामती पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर कामती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विठ्ठल मनोहर बिराजदार (रा.बोरी उमरगे, ता. अक्कलकोट) आणि राजकुमार कुंडलिक बिराजदार (रा.इटगी, ता. अक्कलकोट) या दोघा संशयीतांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, मृत अण्णासाहेब घोडके यांची आई मालन सुरेश घोडके व बहीण शोभा नागेश कनमुटे यांनीच खूनाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार कामतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी मायलेकींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले. बुधवारी मोहोळ न्यायालयाने दोघींनाही २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान दारु पिऊन त्रास देत असल्याने सुपारी देवून खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आहे. मात्र या शिवाय खूनाचे अन्य कोणते कारण होते का? तसेच या कटात आणखी साथीदार सहभागी होते का? या दिशेने पोलिस तपास करीत असून, तशी शक्यता देखील त्यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढी तपास स.पो.नि किरण उंदरे हे करीत आहेत.