Wed, Apr 24, 2019 15:58होमपेज › Solapur › अन्‍नछत्र मंडळ बनत आहे धार्मिक पर्यटनस्थळ 

अन्‍नछत्र मंडळ बनत आहे धार्मिक पर्यटनस्थळ 

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:19PMअक्‍कलकोट : दयानंद दणुरे

अक्‍कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भाविकांना अन्नदान करत भाविकांसाठी एक पर्यटन स्थळ बनत असून याला भाविकांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत आहे. अन्नछत्र मंडळाच्या या उपक्रमामुळे शहर विकासाला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले व कार्यकारी विश्‍वस्त अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे तात्पुरते महाप्रसादगृह उभारण्यात आले आहे. त्यालगतच भाविकांसाठी श्री स्वामी समर्थांची मूर्ती, कर्दळीवनातील स्वामी मंदिर, गोमाता, फायबर दीपखांब, आकर्षक मूर्ती, सर्वत्र सीसीटीव्ही, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाबागाडी आदी सुविधांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात अन्नछत्र मंडळात येत आहेत.दररोजचा महाप्रसाद देताना भाविकांना पर्यटनाच्या जास्तीत जास्त सुविधा अन्नछत्र मंडळ पुरवित असल्याने भाविकांतून समाधान व्यक्‍त केले जात आहे. 

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पोलिस स्टेशन, डिजिटल बोर्ड लावले गेल्यामुळे भाविकांना देवदर्शनासोबतच कुटुंबीयांसोबत धार्मिक पर्यटन होत आहे. नियोजित शिवसृष्टीची तयारी जोरात सुरू असून वर्षभरात ही शिवसृष्टी भाविकांसाठी इतिहासाला उजाळा देणारी पर्वणी ठरणार आहे. भाविकांना दैनंदिन महाप्रसादासोबतच जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अन्नछत्र मंडळ झटत असून त्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्‍त केले जात आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले स्वत:ला स्वामीसेवक समजतात व ही भावना येथे काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांमध्ये दिसून येते.  

स्वामी भक्‍तांच्या सेवेसाठी सुरू झालेले अन्नछत्र मंडळाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून अन्नछत्र मंडळ इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर नित्यनियमाने नवनवीन उपक्रम राबवून भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांना मदत करत असतात. अन्नछत्र मंडळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धर्मसंकीर्तनामुळे अक्‍कलकोटचा महिमा सर्वदूर पोहोचण्यास मदत होत आहे, हे विशेष.